Kopri Pachpakhadi Constituency Assembly Election 2024 : कोपरी - पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांचा पराभव केला आहे. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील 40 आमदार फोडून सत्ता स्थापन केली होती. यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे निवडणुकीत उतरले आणि यावेळीही त्यांनी विजयाची कामगिरी कायम ठेवली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या निवडणुकीत कस लागला. महायुतीच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांना महाविकास आघाडीने तिकीट दिलं होतं.
एकनाथ शिंदेंकडून केदार दिघेंचा पराभव
बंडानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक फार प्रतिष्ठेची मानली जात आहे. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा राखणं, एकनाथ शिंदेसाठी फार महत्त्वाचं मानलं जात होतं. पण, ठाण्यातील आनंद दिघे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाने शिंदेंना केदार दिघे यांचं आव्हान दिलं. यामुळे ही लढत फार अटीतटीची झाली.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ कसा आहे?
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत मोडतो. इथे वर्षानुवर्षे शिवसेनेचीच सत्ता आहे. ठाणे स्टेशनच्या पूर्वेकडील भाग, कोपरी गाव, आनंद नगर हा भाग यात मोडतो तर ठाणे स्टेशनच्या पश्चिमेकडील भागात लुईस वाडी, हाजूरी, रामचंद्र नगर, राम नगर, ज्ञानेश्वर नगर, किसान नगर एक ते चार आणि वागळे इस्टेटचा संपूर्ण भाग याच मतदार संघात येतो.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघांचा इतिहास
ठाणे शहर हा मतदारसंघ अतिशय मोठा असल्याने 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी ठाणे शहर मतदारसंघातून कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ वेगळा झाला. तेव्हा पासून एकनाथ शिंदे यांनाच इथे शिवसेनेतर्फे तिकीट देण्यात येते. 2014 ला मोदी लाट असताना सर्वपक्ष युती आघाडी न करता लढत असताना देखील एकनाथ शिंदे एक लाख मतांनी इथून निवडून आले होते. 2019 मध्येही एकनाथ शिंदेनी शिवसेनेचा गड राखला. आता 2024 मध्ये बंडानंतर येथील मतदार पुन्हा एकनाथ शिंदेंना निवडून देणार का याकडे पाहावं लागणार आहे.
2019 चा निकाल
- एकनाथ शिंदे - शिवसेना (1,13,153 मते)
- संजय घाडीगांवकर - काँग्रेस (24,175 मते)
- महेश कदम - मनसे (21,477 मते)
2014 चा निकाल
- एकनाथ शिंदे - शिवसेना (1,00,016 मते)
- संदीप लेले - भाजपा (48,447 मते)
- मोहन तिवारी- काँग्रेस (17,873 मते)