मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर प्रतिनिधींच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी यासाठी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या सिद्धार्थ इंगळे यांनी निवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेला आधार नसल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे. याचिका मागं घेतली नाही तर रद्द करु अशी भूमिका न्यायालयानं मांडली. ज्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम सुरु असतो त्यावेळी कोर्ट हस्तक्षेप करत नाही, असं न्यायालयानं बजावल्यानंतर याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागं घेतली आहे. यामुळं सिनेटच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई विद्यापीठाकडून दुसऱ्यांदा सिनेटच्या पदवीधर सदस्यांची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. विद्यापीठानं निवडणूक स्थगित करताना राज्य सरकारच्या आदेशाचा दाखला दिला होता. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठ प्रशासनाला तडाखा देत ठरलेल्या दिवशी निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. अखेर मुंबई विद्यापीठानं प्रशासकीय कारण सांगत 24 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याची तर 27 सप्टेंबरला मतमोजणी करु अशी भूमिका मांडली होती.
महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून याचिका मागे
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक होणार असं वाटत असताना एक दिवस अगोदर महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या सिद्धार्थ इंगळे यांनी सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या याचिकेमुळं मतमोजणी लांबणीवर पडते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर मुंबई सिनेट निवडणुकीच्या स्थगिती संदर्भातील याचिका महाराष्ट्र स्टुडंट युनियन मागं घेत असल्याचं म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी एकीकडे मतदान होत असताना आपण स्थगितीची मागणी करत आहात या संदर्भात कोर्टाने विचारलं. यानंतर आपण ही याचिका मागे घेत असल्याचं महाराष्ट्र स्टुडंट युनियन कडून सांगण्यात आलंय.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. एकूण 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई विद्यापीठ सिनेटच्या पदवीधरासाठींच्या जागांवर यापूर्वी महायुतीचं वर्चस्व राहिलं आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वातील युवा सेना विरुद्ध अभाविपचे उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय काही अपक्ष देखील निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं निवडणुकीत उमेदवार दिलेले नाहीत. सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान होत असून 27 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.