मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तर विरोधकांनी हे सरकारने जाणून बुजून केल्याचा आरोप देखील केला जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement

बदलापूरमध्ये त्या लहान मुलींसोबत घटना घडली, तेव्हा अगोदर आरोपींना शोधण्यात शिंदे फडणवीस सरकार कमी पडलं. मदतनीस कसे मोकळे सुटतील याची काळजी घेतली गेली.आरोपीला दुसऱ्या केस मध्ये घेऊन जात असताना त्याने रिव्हॉल्व्हर हिसकून घेतले फायरींग केलं त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे, त्याच्यासोबत आमची सहानुभूती आहे. मात्र, शासनाने त्यांचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा, त्याला कुठे गोळी लागली त्याची संपूर्ण माहिती द्यावी, त्यामुळे जी आता चर्चा सुरू आहे ती थांबेल, आता ज्या केसमध्ये आरोपीला घेऊन जात होते, त्याच्या बायकोच्या तक्रारीबाबत त्याला घेऊन जात होते, नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते त्याचा खुलासा करावा, असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकरांची सोशल मिडीया पोस्ट

कायद्याच्या योग्य पद्धतीशी जुळवून घेतल्याशिवाय न्याय अपूर्ण आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार हे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे पूर्ण अपयश आहे. आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात गोळी मारण्यात आली आहे. पण, आम्हाला आशा आहे की, आरोपीने ज्या पोलिसाला गोळ्या घातल्या होत्या, त्याचा वैद्यकीय अहवाल पोलीस लवकरच जाहीर करतील जेणेकरून हा कट होता की नाही ते स्पष्ट होईल. पोलिसांनी बदली नियमावलीचे पालन केले असते आणि संध्याकाळी 5 नंतर त्यांची बदली केली नसती तर ही संपूर्ण घटना टाळता आली असती असंही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय घडलं?

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला काल(सोमवारी) सायंकाळी सव्वा सहा वाजता तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते. त्यावेळी अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. यात निलेश मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. यानंतर अक्षय शिंदेला कळवा महापालिका रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.