'देश एकंदरीत धोक्यात आहे आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली म्हणून नाही, तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीने पाहतो, या राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो.' असं अहिर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
'आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांची स्तुती देशातील अनेक नेत्यांनी केली आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी अशी भूमिका मांडली आहे की सर्व विरोधी पक्षीयांनी एका व्यासपीठावर यावे. तांत्रिक दृष्टिकोनातून जरी आम्ही एकत्रित येऊ शकलो नसलो तरी स्वतः राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सर्वच आमचे स्टार प्रचारक आहेत' असं आपण मानत असल्याचं अहिर म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन माणसं देशाच्या राजकीय पटलावरुन बाजूला होणं गरजेचं आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी पंतप्रधान-भाजपाध्यक्षांच्या जोडगोळीवर निशाणा साधला होता. लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात मनसे उतरणार नसलं, तरीही मोदी आणि शाहा यांच्याविरोधात सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. सध्या मोदींच्या विरोधातल्या प्रचाराचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना होऊ देत, तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेशही राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते.
आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी-शाह विरुद्ध देश अशी असेल. यापुढे मी ज्या सभा घेईन त्या नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्याविरोधातल्या असतील, असं राज यांनी स्पष्ट केलं. आपली लढाई ही कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह या दोघांच्या विरोधात आहे. त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह नकोत, म्हणून भाजपला मतदान करु नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
नरेंद्र मोदींनी शरद पवार, बारामतीचं राजकारण आणि काका-पुतण्यावर ओढलेल्या ताशेऱ्यांच्या भाषणाची चित्रफीत आधी राज ठाकरेंनी लावली. त्यानंतर पवारांची बारामती आणि त्यांच्या दूरदृष्टीवर स्तुतिसुमनं उधळतानाचेही व्हिडिओ सादर करण्यात आले. त्यानंतर मोदींसारखा खोटा पंतप्रधान मी आजवर पाहिला नसल्याचंही राज म्हणाले.