चेन्नई : तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुक (ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कड़गम) आणि विरोधी पक्ष द्रमुकने (द्रविड़ मुनेत्र कड़गम) मंगळवारी (19 मार्च) लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात दोन्ही पक्षांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचे धक्कादायक आश्वासन दिले आहे. या जाहीरनाम्यांमुळे केवळ तामिळनाडूमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.


अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांनी जाहीरनाम्याद्वारे मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. परंतु राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचे धक्कादायक आश्वासनदेखील दिले आहे. तसेच नोटाबंदीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

याआधी अनेकदा डीएमकेने तामिळनाडू राज्य सरकार आणि राज्यपालांकडे या प्रकरणातील दोषींच्या सुटकेची मागणी केली आहे. आज सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.


राजीव गांधींचे मारेकरी 28 वर्षांपासून तुरुंगात
21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरंबदूर येथे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सात जण गेल्या 28 वर्षांपासून तुरुंगात आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये तामिळनाडू सरकारने राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे दोषींची सुटका करण्याची परवानगी मागितली होती.