Muktainagar Nagarparishad Election Result 2025: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपच्या पराभवाचे खापर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसे कुटुंबावर फोडले आहे. निकालानंतर केलेल्या परखड वक्तव्यामुळे जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा महाजन विरुद्ध खडसे हा जुना वाद ऐरणीवर आला आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष या ठिकाणी केंद्रित झाले होते. प्रचारादरम्यान आरोप–प्रत्यारोप, वादग्रस्त विधानं आणि राजकीय तणाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः प्रचारात सक्रिय झाल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, निकालात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी तब्बल 2,583 मतांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला, आणि मुक्ताईनगरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. या निकालाकडे पाहता, ही केवळ स्थानिक विजय-पराभवाची लढाई न राहता, खडसे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले'
या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत, “एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला आहे,” असे खळबळजनक विधान केले. ते पुढे म्हणाले की, “एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात असताना भाजपच्या व्यासपीठावर येऊन प्रचार करतात, हे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पटले नाही. याचा थेट फटका आम्हाला बसला.
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे यांचं आता काहीही राजकीय वजन उरलेलं नाही
महाजन यांनी खडसे कुटुंबाच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकनाथ खडसे यांचं आता काहीही राजकीय वजन उरलेलं नाही. दोन वेळा त्यांची मुलगी विधानसभेत उभी राहिली, पण दोन्ही वेळा मोठ्या फरकाने पराभूत झाली,” असा टोला त्यांनी लगावला. मुक्ताईनगरमध्ये भाजपची जागा गमवावी लागल्याची खंत व्यक्त करत, या पराभवामागे खडसे कुटुंबच जबाबदार असल्याचा आरोप, महाजन यांनी केला. दरम्यान, या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि जुन्या वादांचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुक्ताईनगरचा निकाल हा केवळ नगरपंचायतीपुरता मर्यादित न राहता, जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरत असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा
Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर