मुखेड विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा अंतर्गत येतो. हा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी आहे.  मतदारसंघाच्या शेजारी एकीकडे लातूर जिल्हा तर दुसरीकडे नायगाव आणि देगलूर तालुके येतात.  मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी कायम इतरत्र जावे लागते. शेती हे या मतदारसंघातील प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. मुखेड तालुक्याची भौगोलिक रचना रानमाळाची आहे. शेती हा इथला प्रमुख उद्योग असला तरी या मतदारसंघात सिंचनाची पाहिजे तशी सोय नाही त्यामुळे शेती ही निसर्गाच्या भरवशावर आहे. शिवाय प्रत्येक उन्हाळ्यात या मतदारसंघातील लोक हे हाताला काम नाही आणि प्यायला पाणी नाही म्हणून मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्यात जातात. थोडक्यात काय तर दुष्काळ आणि बेरोजगारी या मतदारसंघाच्या पाचवीलाच पुजलेली. मतदारसंघात लेंडी प्रकल्प होऊ घातलाय पण ज्या मुलांच्या लहानपणी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ झाली ती मुले आता या देशाचे मतदार झालेत त्यांनी 2014 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदानही केलंय पण लेंडी प्रकल्प पूर्ण झाला नाही. निवडणुकांत हा मुद्दा येतो, आश्वासन मिळते, निवडणूक होतात आमदार खासदार निवडले जातात पण प्रकल्पाचं काम एक इंचही पुढे सरकत नाही.


सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे डॉ. तुषार राठोड करत आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या तुषार राठोड यांना मतदारसंघाचा आजार कळलाच नाही असे चित्र आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार तुषार राठोड यांचे वडील स्वर्गीय गोविंद राठोड हे 73 हजार 291 मतांनी विजयी झाले पण आमदारकीचा शपथविधी होण्यापूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीत गोविंद राठोड यांचे चिरंजीव डॉ. तुषार राठोड हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले. खरंतर गोविंद  राठोड यांच्या निधनानंतर तुषार राठोड यांच्याबद्दल मतदारांना सहानुभूती होती पण प्रत्यक्ष मतदानात तुषार राठोड याना त्यांच्या वडीलांपेक्षा 26 हजार 43 मतं कमी पडली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी भाजपला कौल दिला. या मतदारसंघातून भाजपला सुमारे 20 हजारांचे मताधिक्य आहे.

2019 साठी भाजपकडून इच्छुकांची यादी मोठी आहे. विद्यमान आमदार तुषार राठोड, हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, व्यंकट पाटील गोजेगावकर हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

तुषार राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात रोजगाराच्या निर्मितीसाठी काही प्रयत्न केले असतील तरीही प्रत्यक्षात मतदारसंघात रोजगार निर्मिती झालेली दिसत नाही. शेती हा मुख्य उद्योग असल्याने सिंचन महत्वाचे होते पण विद्यमान आमदारांच्या काळात सिंचनाच्या नव्या कोणत्याही योजना आल्या नाहीत.  हेच मुद्दे तुषार राठोड यांच्या विरोधातील आहेत. राठोड यांचा जनसंपर्कही फारसा वाखाणण्याजोगा नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीत तुषार राठोड यांनी पक्षाला विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मिळालेले मताधिक्य हे भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्यव्यापी योजनांचे आहे की आमदारांच्या कामाचे हा चर्चेचा विषय आहे.

सध्या हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी असलेले रामदास पाटील हे भाजपकडून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा आहे. स्वतः रामदास पाटील यांनीही या चर्चेचे खंडन कधी केलेले नाही. रामदास पाटील हे लिंगायत समाजाचे आहेत. शिवाय महाराष्ट्र मुख्याधिकारी संघटनेचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. लिंगायत अधिकाऱ्यांचे संघटनही पाटील यांनी केलेले आहे. पाटील यांचा बालपणापासून या मतदारसंघात वावर आहे. पाटील हे तरुण अधिकारी आहेत. नातं निर्माण करणं आणि ते जपणं सोबतीला वक्तृत्व कौशल्य आणि संघटन कौशल्य या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मुखेड विधानसभा मतदारसंघात लिंगायत मतदार हा संख्येने दुसरा मोठा मतदार आहे. त्यामुळेच रामदास पाटील यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. मुखेड मतदार संघात लिंगायत उमेदवार देऊन त्याचा फायदा जिल्ह्यात आणि शेजारील मतदारसंघात भाजपला घेता येईल याची जास्त शक्यता वाटते. डॉ विरुपाक्ष आणि व्यंकट पाटील यांची भाजपकडून इच्छा असली तरी त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता दिसत नाही.

2009 साली राखीव असलेला मतदारसंघ खुला झाला आणि काँग्रेसचे हनुमंत पाटील हे विजयी झाले. पण त्यांचा हा विजय फारसा उल्हासदायक नव्हता कारण केवळ 1 हजार 216 मतांच्या फरकाने हनुमंत पाटील हे विजयी झाले. 2009 साली राज्याचे मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाण यांच्याकडे होते आणि त्यावेळी जिल्ह्यातील सर्वच विधानसभेत आघाडीच्या जागा विजयी झाल्या. हनुमंत पाटील हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणू ओळखले जातात. 2009 साली हनुमंत पाटील विजयी झाल्यानंतर अशोक चव्हाणांच्या मदतीने मतदारसंघाचे चित्र बदलेल अशी आशा होती पण परिस्थिती जैसे थे दिसली. हनुमंत पाटील यांचे भाऊ दिलीप पाटील हे काँग्रेसचे जिल्हा परिषद आहेत. जिल्ह्यात या बंधूना राजबंधू म्हणून नाव मिळाले. पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि विधानसभेच्या आमदारकीच्या माध्यमातून या मतदारसंघाचा चेहरा बदलणं मतदारांना अपेक्षित होतं. मात्र चित्र बदललं नाही. परिणामी 2014 च्या विधानसभेत हनुमंत पाटील यांचा पराभव झाला आणि 2015 च्या पोटनिवडणुकीत देखील पराभव झाला. या राजबंधूंच्या कार्यकाळात रोजगार हमी योजनेत मोठा घोळ झाल्याच्या तक्रारी झाल्या आणि याचे खापर राजबंधूंवर फुटले.

कुडाळ विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे आपला गड परत मिळवणार का?

शेषेराव चव्हाण हे या मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. चव्हाण यांनी या मतदारसंघात सहकारी साखर कारखाना उभारला. सुरुवातीला हा साखर कारखाना चांगला चालला. शेतकरी आणि बेरोजगारांना उत्पन्नाचं साधन मिळालं. पण सहकारी तत्वावरचा हा साखर कारखाना बंद पडून खाजगी तत्वावर गेला. चव्हाण यांच्या सुनबाई वैशाली चव्हाण यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळाले. त्या कालावधीत मतदारसंघात ग्रामीण रस्ते आणि वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना मिळाल्या. विधानसभेला दोन वेळेला तिकीटाची मागणी करूनही शेषेराव चव्हाण यांना तिकीट मिळाले नाही. यावेळी पुन्हा एकदा पक्षाकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली आहे. राजबंधू म्हणजे मतदारसंघातील काँग्रेस हा शिक्का पुसण्याचा काँग्रेसने विचार केला तर शेषेराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे प्रमुख दावेदार असतील.

या मतदार संघात धनगर हटकर समाज हा सर्वाधिक संख्येने आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनगर हटकर समाज हा संख्येने 55 हजार असूनही वंचित आघाडीला या मतदारसंघातून 19 हजार मतं मिळाली. वास्तविक लोकसभेला वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे हे स्वतः धनगर समाजाचे होते. आता विधानसभेला पुन्हा एकदा यशपाल भिंगे यांचे नाव मुखेड मतदारसंघातून पुढे येत आहे.

मुखेड मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागा येतात. त्यातील पाटील यांच्याकडे 4 जागांवर काँग्रेस भाजप 3 शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. मुखेड पंचायत समितीमध्ये भाजप 8, काँग्रेस 4, शिवसेनेचे 2 असे संख्याबळ आहे. मुखेड बाजार समितीत भाजपला 14 तक काँग्रेस शिवसेना युतीला 4 जागा आहेत.

मुखेड नगरपालिकेमध्ये भाजप-शिवसेनेचे 12 काँग्रेस 2, रासप 2, अपक्ष 1 असे संख्याबळ आहे. मात्र जनतेने काँग्रेसच्या बाबुराव देबडवार यांना नगराध्यक्षपदी निवडले आहे.

भाजप आमदार तुषार राठोड आणि काँग्रेस नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांच्यात बरेच मतभेद आहेत. त्यामुळे मुखेड नगरपालिका क्षेत्रात जनतेला मूलभूत सुविधांपासूनही बराच काळ वंचित राहावे लागले. याचा फटका या विधानसभा निवडणुकीत तुषार राठोड आणि काँग्रेस या दोघांनाही काही प्रमाणात का असेना बसणार आहे.

एकूणच या मतदारसंघात मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. भाजप आणि काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. पण विद्यमान आमदारांविरोधात आणि राजबंधू अर्थात  हनुमंत पाटील आणि दिलीप पाटील यांच्या विरोधात जनतेत नाराजीचा सूर असल्याने हे दोन्ही पक्ष उमेदवार बदलतात कि याच लोकांवर पुन्हा विश्वास दाखवतात यावर जय-पराजयाचे समीकरण अवलंबून आहे.

जाणून घ्या या मतदारसंघाविषयी