पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यातील सभेवेळी शहर भाजपतर्फे घालण्यात आलेला फेटा चर्चेचा विषय बनलाय. रेशमी कापडापासून तयार करण्यात आलेल्या या फेट्यावर सोनेरी वर्ख लावून नक्षीकाम करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांनी त्याला मढवण्यातही आलं होतं. भाजपचं निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाची फुलं नक्षीदार खड्यांच्या रुपात या फेट्यावर जडवण्यात आली होती. फेट्याची एकूणच रंगसंगती भाजपच्या ध्वजातील रंगांशी मिळतीजुळती होती. शहर भाजपने पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाल्यांकडून हा फेटा खास मोदींसाठी तयार करुन घेतला होता. मुरूडकर झेंडेवाल्यांकडून याबद्दल 'एबीपी माझा'नं माहिती घेतली. हा फेटा तयार करायला सहा दिवस लागले. फेट्याच्या सहा प्रतिकृती तयार करण्यात आल्या आणि त्यातील एक अंतिम करुन त्यावर सोन्याचं नक्षिकाम करण्यांत आलं. हा फेटा तयार करायला नक्की किती खर्च आला हे मात्र मुरुडकर झेंडेवालेंनी सांगितलं नाही.