राजकारणात घराणेशाहीवर नेहमी बोलले जाते आणि टीका देखील केली जाते. मात्र तरीही घराणेशाही थांबायचे नाव मात्र घेत नाही. पक्षांमध्ये काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात संधी कधी मिळणार हा प्रश्न या निमित्ताने नक्की पडत आहे. कारण महाराष्ट्रातील राजकारणात काही परिवारांचे वर्चस्व आणि त्याच परिवाराच्या वाट्याला सगळी राजकीय पदं उपभोगायला मिळत असल्याचे चित्र आहे. अर्थात यामधल्या अनेकांचे स्वतःचे कर्तृत्व असेलही मात्र तळागाळात काम करणारा कार्यकर्ता घराणेशाहीमुळे  राजकारणाच्या या सारीपाटावर बहुतांशदा सतरंजी उचलण्याचेच काम करताना दिसून येतो. राजकीय क्षेत्रामधील नात्यांचा गोतावळा सामान्य लोकांनी खरंतर लक्षात घेण्याजोगा आहे. कारण एकीकडे नेत्यांपायी एकमेकांशी वैर करणारे कार्यकर्ते तर दुसरीकडे विरोधात असून देखील राजकीय खुर्ची सांभाळणारे नेते असा विरोधाभास दिसून येतोय. सक्रिय राजकारणात घराणेशाहीचा आणि नात्यागोत्यांचा हा पॅटर्न आज पवार, देशमुख, चव्हाण, मुंडे, विखे पाटील व्हाया आज ठाकरे परिवारापर्यंत येऊन पोहोचला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.  राज्याच्या राजकारणातील नातीगोती आणि घराण्यांचा प्रभाव जाणून घेऊयात.


पवार फॅमिलीची राजकीय 'पॉवर'


पवार फॅमिलीची 'पॉवर' राज्याच्या राजकारणात जबरदस्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केलेल्या शरद पवार यांच्या परिवारातून अनेक सदस्य आज राजकारणात आहेत. पुतणे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. आता तिसरी पिढी रोहित आणि पार्थ पवार यांच्या रूपाने राजकारणात दिसत आहे. पवार यांच्या परिवाराशी संबंधित आहेत उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा ह्या  माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी. पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील आता तुळजापूरमधून भाजपकडून मैदानात आहेत. तर पद्मसिंह पाटील परिवाराशी वैर असलेले शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे आणि पद्मसिंह हे सख्खे चुलतभाऊ.


ठाकरे फॅमिली


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा सांभाळली आहे. यंदा ठाकरे परिवारातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काका राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न देऊन मोठा आशीर्वाद दिला आहे. मात्र दुसरीकडे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात कुठलीही कसूर करत नाहीयेत.


 


मराठवाड्यात मुंडे, देशमुख, निलंगेकरांचीच हवा  


मराठवाड्यात बीडमध्ये मुंडे परिवाराची तर लातूरमध्ये देशमुख, निलंगेकर यांच्याच परिवाराची हवा असलेली दिसायला मिळते. भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या दोन कन्या आज सक्रिय राजकारणात आहेत. पंकजा मुंडे या मंत्री तर त्यांची बहीण डॉ. प्रीतम ह्या बीडमधून खासदार आहेत. विरोधक असले तरी मुंडे परिवारातलेच धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि मुंडे भाऊ-बहिणीमध्ये काट्याची टक्कर परळीतून होतेय. याच मुंडे परिवाराशी भाजपचे बडे नेते असलेले स्व. प्रमोद महाजन यांच्या परिवाराशी जवळचे नाते. गोपीनाथ मुंडे यांनी महाजन यांच्या बहिणीशी लग्न केले. याच प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन देखील खासदार आहेत. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्याचे आणि देशाचे राजकारण गाजवले. आज त्यांचे दोन्ही पुत्र राज्याच्या राजकारणात आहेत. अमित देशमुख लातूर शहरातून तर धाकटे चिरंजीव धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून विधानसभेच्या मैदानात आहेत. निलंग्यामध्ये माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील यांना पुन्हा निलंगामधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आहेत. तर औसामधून संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्या विरोधात दंड थोपटल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेकडून मंत्री जयदत्त क्षीरसागर तर राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर हे मैदानात आहेत. तर  केजमधून माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा ह्या मैदानात आहेत.


भुजबळ परिवार


राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवल्यातून तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ  नांदगावमधून मैदानात आहेत. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ देखील खासदार होते.


खडसे परिवार


भाजपची राज्यभरात पायाभरणी करण्यात महत्वाची भूमिका असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचं मंत्रिपद गेलं. विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट न देता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मुक्ताईनगरमधून मैदानात आहेत. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर लोकसभेतून खासदार आहेत.


 


तटकरे परिवार


रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनमधून लढत आहेत. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे माजी आमदार होते. तर अनिल तटकरे यांचे पुत्र श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. अवधूत यांना मात्र शिवसेनेने उमेदवारी दिली नाही.


 


नाईक परिवारातील जंग


यवतमाळच्या पुसदमध्ये मंत्री मनोहरराव नाईक यांच्या परिवारात देखील अंतर्गत वाद आहेत.  राष्ट्रवादीकडून मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील तर भाजपकडून त्यांचे चुलतभाऊ निलय नाईक अशी लढत होत आहे.


सोलापूर जिल्ह्यातला नात्यांचा गोतावळा


माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे या सोलापुरातून पुन्हा मैदानात आहेत. अकलुजचे 'सिंह' अर्थात विजयसिंह मोहिते पाटील यांचा परिवार देखील महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा राहिलेला आहे. शंकरराव मोहिते पाटील यांचे पुत्र विजयसिंह आणि प्रतापसिंह हे दोघे एकमेकांच्या विरोधात देखील लढले आहेत. विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह खासदार राहिले आहेत. सध्या ते राष्ट्रवादीला रामराम ठोकत आता भाजपवासी झाले आहेत.  मोहिते पाटलांच्या परिवारातले बरेच सदस्य जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. माढ्यातून बबनराव शिंदे राष्ट्रवादीकडून तर करमाळातून त्यांचे बंधू संजय शिंदे अपक्ष मैदानात आहेत. शिंदे यांचे वडील विठ्ठल शिंदे हे देखील सोलापूरच्या राजकारणात सक्रिय होते. माजी मंत्री दिगंबर बागल यांची कन्या रश्मी बागल शिवसेनेकडून करमाळ्यातून रिंगणात आहे.  तर सांगोल्यातून ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासोबतच संगमनेरमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मैदानात आहेत. थोरातांचे भाचे सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.  पुरंदरमधून माजी आमदार चंदूकाका जगताप यांचे पुत्र संजय जगताप मैदानात आहेत. तर नवापूरमधून माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक यांचे पुत्र शिरीष नाईक हे विधानसभा लढत आहेत. रावेरमधून माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे पुत्र शिरीष चौधरी, सावनेरमधून सुनील केदार, चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना वरोरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पलूसमधून दिवंगत मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम हे काँग्रेसकडून मैदानात आहेत. सांगलीतून माजी खासदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. तसेच कोल्हापुरातून शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे नातू व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापुरातून महाडिक विरुद्ध पाटील अशी लढत आहे.  ऋतुराज हे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे तर अमल महाडिक हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे पुतणे.  तासगावातून दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या मैदानात आहेत. खेडमधून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम मैदानात आहेत.  माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश यांना देवळालीतून तर माजी मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला गावित यांना तर इगतपुरीतून विक्रोळीतून खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. कणकवलीतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे भाजपकडून मैदानात आहेत.  माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे पुण्यातील शिवाजीनगरमधून  निवडणूक लढवत आहेत. शेवगावातून माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे तर कोपरगावातून स्नेहलता कोल्हे आणि नाशिकमधून हिरे घराण्यातील सीमा हिरे मैदानात आहेत. वाईतून मदन भोसले, गेवराईतून लक्ष्मण पवार, अकोल्यातून माजी मंत्री मनोहर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड भाजपकडून मैदानात आहेत.  हिंगण्यातून माजी खासदार दत्त मेघे यांचे पुत्र समीर मेघे मैदानात आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादीला राम ठोकून भाजपवासी झालेले गणेश नाईक ऐरोलीतून ऐन वेळी मैदानात उतरले आहेत. आमदार संदीप नाईक यांनी आपल्या पित्यासाठी ही जागा खाली केली.  तर गणेश नाईकांचे मोठे पुत्र संजीव नाईक हे माजी महापौर होते. जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भाजपकडून मैदानात आहेत.  खामगावातून माजी मंत्री पांडुरंग फूडकर यांचे पुत्र आकाश पांडुरंग फुंडकर हे मैदानात आहेत.  विक्रमगडमधून मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र  डॉ. हेमंत विष्णू सावरा, शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील हे मैदानात आहेत, त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे खासदार आहेत.  कुलाब्यातून विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ही आणि अशी भलीमोठी राजकीय गोतावळ्याची यादी आहे. काही नावं निश्चितच राहिली असतील. एकंदरीत काय तर कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या, नेत्यांच्या सभेची बैठक व्यवस्था बघायची, माईक टेस्टिंग करायची. जाता जाता सोशल मीडियात व्हायरल झालेली एक छोटीशी गोष्ट नक्की वाचा. ती गोष्ट अशी... मला खूप दिवसांपासून प्रश्न पडला आहे की, बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून प्यादीच पुढे का असतात?उभा-आडवा मारा करु शकणारे बलदंड हत्ती, कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक उंट, उलटसुलट अडीच घरां पल्याड जाऊन हल्ला चढवू शकणारी घोडी, सर्वशक्तिमान वजीर आणि महामहीम बादशहा एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली, किरकोळ देहयष्टीची, एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी! हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला!बरं, इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरु शकतात. प्याद्यांना ती मुभा नाही. एवढंच काय जीवाच्या आकांताने एखाद्या प्याद्याने शत्रूचा प्रदेश पादाक्रांत करून अंतिम रेषा गाठलीच तरी पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच होणार. तसा रिवाजच आहे!थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात ती बळी जाण्यासाठीच. प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच. का ते विचारायचं नाही.सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार. स्मारकं मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार. इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार. उदोउदोही मानकर्‍यांचाच होणार. कारण, तसाच रिवाज असतो! ही गोष्ट प्रत्येक 'निष्ठावान' कार्यकर्त्यांनी आपापल्या डोक्यात फिट्ट करणे गरजेचे आहे. हे ही वाचा - 'निष्ठावान' कार्यकर्त्याहो पोटापाण्याचं बघा