कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाची चिंता करु नये. माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत आणि माझी आई कोल्हापूरची होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी (3 एप्रिल) कोल्हापुरात आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

वर्ध्यातील प्रचार सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली होती. "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. शरद पवारांची पक्षावरील पकड सैल होत असून पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत," असं मोदी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार उत्तम काम करतात. ते उत्तम प्रशासक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणा एकाचा नसून जनतेचा पक्ष आहे.

तसंच यावेळी शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी कुठे गेले तर गांधी कुटुंबावर टीका करतात. मात्र इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवून इतिहासच नाही तर भूगोल घडवला, असंही शरद पवार म्हणाले. तसंच सोनिया गांधी यांची स्तुती करत राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरही त्यांनी देश सोडला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी जपली, असंही पवारांनी नमूद केलं.

तर मोदींनी केवळ हिंदू-हिंदू सुरु केलं असून देशासाठी सर्वच जातीधर्माचं योगदान आहे. त्यामुळे मोदींनी पदाचा आणि शपथेचा द्रोह केला आहे. असा द्रोह करणाऱ्या व्यक्तीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं पवारांनी म्हटलं. तसंच पवारांनी यावेळी राफेल करार आणि रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीत गृहयुद्ध, पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत : पंतप्रधान मोदी

VIDEO | मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करु नये : शरद पवार