महाराष्ट्रात राज ठाकरेंचा फायदा उचलण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी : मनसेचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2019 08:26 PM (IST)
निवडणुकीमध्ये महाआघाडीला विखे-पाटील, मोहिते पाटलांना सांभळता आलं नाही, असा आरोप देखील देशपांडे यांनी केला. नेटिजन्स आणि उद्धव ठाकरेंना दखल घ्यावी लागते याचा अर्थच हा आमचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
MUMBAI, INDIA - APRIL 23: MNS chief Raj Thackeray addresses during a public rally at Shahid Bhagat Singh, Kalachowk, on April 23, 2019 in Mumbai, India. (Photo by Anshuman Poyrekar/Hindustan Times via Getty Images)
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचा आणि भाषणाचा फायदा घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अपयशी ठरली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. राज ठाकरेंनी तयार केलेल्या वातावरणानंतरसुद्धा आघाडीचे कार्यकर्ते अपयशी ठरले असल्याचा आरोप, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे. निवडणुकीमध्ये महाआघाडीला विखे-पाटील, मोहिते पाटलांना सांभाळता आलं नाही, असा आरोप देखील देशपांडे यांनी केला. नेटिजन्स आणि उद्धव ठाकरेंना दखल घ्यावी लागते याचा अर्थच हा आमचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी मोठ्या ताकदीनं रिंगणात उतरणार असल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान, भाजपच्या या मोठ्या विजयानंतर राज ठाकरे यांनी 'अनाकलनीय' अशा एका शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर लोकसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपप्रणित एनडीएला 347 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 87 जागांवर आघाडी मिळाली आहे. 108 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील प्रचारादरम्यान सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. निवडणूक काळात राज यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली होती. नुसतीच टीका केली नाही तर राज यांनी सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले, ते सिद्ध करण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून राज यांनी काही पुरावेदेखील सादर केले. राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा काग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड आणि सातारावगळता इतर सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा कांग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीपेक्षा आम्हालाच जास्त फायदा झाला आहे. तर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आमच्या सभांमुळे भाजप-शिवसेनेचं मताधिक्य खूप कमी झालं आहे. केवळ वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फोडल्यामुळे भाजप-शिवसेनेचे उमेदवार तरले आहेत.