मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरु आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त  मैदानात उतरणार आहे.


अभिनेता संजय दत्त आता प्रिया दत्त यांच्यासाठी रोड शो करणार आहे. संजय दत्त सहा विधान सभा मतदारसंघात प्रिया दत्तसाठी रोड शो करणार आहे. सध्या प्रिया दत्त यांचा प्रचार हा लहान मोठ्या बैठका, डोर टू डोर प्रचार अशा पद्धतीने सुरु आहे. आता त्याच्या मदतीला भाऊ संजय दत्त येणार आहे. सोमवारपासून संजय दत्त यांच्या रोड शोला होणार सुरुवात करणार आहे.

मुंबईतील उत्तर मध्य मुंबई या मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त टक्कर देणार आहेत. गेल्यावेळी प्रिया दत्त यांना पूनम महाजन यांनी पराभूत केल्यामुळे त्यांच्याकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. सुरुवातीला प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र पक्षातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर प्रिया दत्तही पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार झाल्या आहेत.

प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1.86 लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आपला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी प्रिया दत्त पुन्हा कंबर कसतील.

प्रिया दत्त यांची वार्षिक कमाई 13.13 कोटी रुपये इतकी आहे. 2014 साली शपथपत्रात त्यांनी त्यांची वार्षिक कमाई 56.86 लाख असल्याचे सांगितले होते. 2014 साली दत्त यांच्याकडे 3.19 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यामध्ये वाढ होऊन आता त्यांच्याकडे 17.84 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर दत्त यांच्याकडे 60.3 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती, ती वाढून आता 69.77 कोटी रुपये झाली आहे. प्रिया दत्त या मुंबईतल्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.

संबंधित बातम्या

पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांची संपत्ती किती?


गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स


लोकसभा लढवण्यास प्रिया दत्त तयार, पूनम महाजनांकडून पराभवाचा वचपा काढणार?


VIDEO | उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा अर्ज दाखल | मुंबई | एबीपी माझा