Raj Thackeray मुंबई: महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) एकही उमेदवार जिंकला नाही. विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यातील 125 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही पराभव झाला होता. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही माहीम विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज (25 नोव्हेंबर) मुंबईत मनसेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मनसेच्या उमेदवारांनी बैठकीत उघडपणे नाराजी जाहीर केली.   


मनसेच्या बैठकीत काय घडलं?


राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. या बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएमबाबात मते जाणून घेतली. यासोबतच भाजपसोबत जाणं ही चूक झाली, अशी स्पष्ट नाराजी उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आली. 


मनसेची मान्यता रद्द होणार?


नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आलं. मनसेची निवडणुकीत अतिशय सुमार कामगिरी पाहायला मिळाली. पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. शिवाय पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी पक्षाची मतांची टक्केवारी देखील मिळवता आली नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबतची माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर एकूण आठ टक्के मतदान पाहिजे किंवा एक जागा निवडून यायला पाहिजे. दोन जागा आणि सहा टक्के मतदान किंवा तीन जागा आणि तीन मतदान मिळायला हवं, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे, असं अनंत कळसे म्हणाले. महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मागील विधानसभेचं चित्र पाहिलं तर त्यांचा एक आमदार निवडून आला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


Raj Thackeray MNS Meeting : भाजपसोबत जाणं ही चूक, पराभूत उमेदवारांची राज ठाकरेंसमोर नाराजी, VIDEO:



संबंधित बातमी:


Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे राज ठाकरेंचे 3 प्रमुख उमेदवार पराभूत; धक्कादायक आकडेवारी समोर