औरंगाबाद : विधानसभेच्या तोंडावर जागावाटपावरुन वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी तुटल्याचं खासदार इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं होतं. पण पुन्हा ही आघाडी व्हावी अशी इच्छा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे. वंचित आघाडी आणि एमआयएमची आघाडी कायम राहावी अशी इच्छा आहे. अजून सगळं संपलं नाही, आघाडी शक्य असल्याचं वक्तव्य करत जलील यांनी यू टर्न घेतला आहे.
वंचितशी घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमकडून पुन्हा मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. वंचित आघाडी आणि एमआयएमची आघाडी होण्यासाठी आंबेडकरांनी ओवेसींना फोन करावा, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत घोषणा केली होती. विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं इम्तियाज जलील यांनी परिपत्रक जारी करत म्हटलं होतं.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं. प्रकाश आंबेडकरांना भविष्यातील राजकारणासाठी शुभेच्छा आहेत. आमची युती झाली नसली तरी समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एमआयएम स्वबळावर लढेल, लवकरच औरंगाबादमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होतील असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं.
दरम्यान यानंतर देखील वंचित बहुजन आघाडीकडून एक परिपत्रक काढून याविषयी जोवर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोवर वंचित आणि एआयएम आघाडी कायम असल्याचे म्हटले होते. एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून केल्यानंतर वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचं जलील यांनी औरंगाबादमध्ये सांगितले होते. शिवाय आता तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही आमची ताकद दाखवतो, असं आव्हानही वंचित बहुजन आघाडीला दिले होते.
'वंचित' आणि एमआयएमची आघाडी व्हावी, इम्तियाज जलील यांचा यू टर्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2019 06:23 PM (IST)
विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत घोषणा केली होती. विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं इम्तियाज जलील यांनी परिपत्रक जारी करत म्हटलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -