नाशिक : "शरद पवारांसारखे अनुभवी नेतेही मताचं राजकारण करतात. त्यांना शेजारचा देश खूप चांगला वाटतो, त्यांची मर्जी पण सगळ्या देशाला माहित आहे की दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला. भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप सोहळा नाशिकमध्ये झाला. या सोहळ्यातील भाषणात पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत विरोधकांवर टीकाही केली.


पवार काय म्हणाले होते?
पाकिस्तान आणि भारतात वेगळीच फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात केलं होतं. "पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत. देशात एक वेगळं वातावरण पसरवलं जातं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे".

काही मतांसाठी शरद पवार मतांचं राजकारणं करतात
पवारांच्या या विधानावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "कलम 370 च्या मुद्द्यावर काँग्रेसचा संभ्रम मी समजू शकतो. पण शरद पवार? त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्यानेही मतांचं राजकारण करावं? शेजारी देश त्यांना खूप चांगला वाटतोय, हे त्यांचं आकलन असेल. पण सगळ्या देशाला माहिती आहे दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे.

मुख्यमंत्र्यांकडूनही शरद पवारांवर टीका
"मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब द्यायला महाराष्ट्रात जात आहेत, असं म्हणतात. असे हिशेबनीस आमच्या घरी पूर्वी लिहायला असायचे. कोण ते मी सांगत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात उत्तर दिलं.

ते म्हणाले की, "शरद पवारजी तुमची मानसिकताच राजेशाही होती. सेवकाचं काम असतं जनतेमध्ये जाऊन हिशोब देणं. म्हणून लोकांनी तुमचा पराभव करुन सेवकांना निवडून दिलं. यापुढेही ते सेवकांना निवडून देतील. काँग्रेसचं तर महाराष्ट्रात अस्तित्वच दिसत नाही. गेल्या निवडणुकीत मोदींचं नेतृत्त्व आणि शिवरायांचा आशिर्वाद होता आता तर त्यांच्या वंशाचीही आम्हाला सोबत आहे."

पवारही बीडमधून लढले तरी जिंकणार नाहीत : पंकजा मुंडे
तर महिला बालकल्याण आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील भाषणातून शरद पवारांना टोला लगावला. "खुद्द शरद पवार जरी बीड शहरातून निवडणुकीला उभे राहिले तरी बीडची जनता त्यांना निवडून देणार नाही," असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी परळीतून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता परळीत पुन्हा एकदा मुंडे भावा-बहिणीतला संघर्ष पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या