जालना : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलक व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली असून कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आणि कुठे उमेदवार पाडायचे याबाबत भूमिका स्पष्ट केली. निवडणूक (Election) लढविण्यात येणाऱ्या मतदारसंघांची माहिती देताना, आज रात्री 9 वाजताच्या सुमारास कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार आणि कोणत्या नाही, याबाबत मराठा समाजबांधव व इच्छुकांना स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे, राजधानी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून एकही उमेदवार देण्यात येणा नाही. मात्र, तेथील 23 आमदारांना पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मुंबईतील 23 च्या 23 मतदारसंघात आमदारांना पाडणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यामुळे, मनोज जरांगे यांचं मिशन मुंबई ठरलंय, हे दिसून येत आहे. मुंबईत जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवार निवडणूक लढणार नाही, पण येथील आमदार पाडण्यासाठी ते पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी अंतरवाली सराटीतून बोलताना म्हटले. तर, सांगली जिल्ह्यात देखील ते एकही उमेदवार देणार नाही, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे, मनोज जरांगेंच्या राजकीय भूमिकेची दिशा आता निश्चित व स्पष्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अद्याप त्यांच्याकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, त्यांनी उमेदवारांसाठी मतदारसंघांची घोषणा केली आहे. दरम्यान, मुंबईत कुलाबा ते दहीसर एकूण 36 आमदार आहेत, 36 मतदारसंघ आहेत. त्यामुळे, जरांगे पाटील यांनी कोणत्या 23 मतदारसंघांबाबत निर्णय घेतलाय हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
उमेदवार उभे करण्यात येणारे मतदारसंघ
1) केज, (बीड जिल्हा)
2) परतूर, (जालना जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) बीड, (बीड जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी, (परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड )
8) निलंगा, (जिल्हा लातूर )
9) कळंब, (धाराशिव जिल्हा,)
10) भूम परंडा, (धाराशिव जिल्हा,)
11) दौंड ( पुणे जिल्हा )
12) पर्वती (पुणे जिल्हा)
13) करमाळा (सोलापूर)
14) पाथर्डी -शेगाव (नगर)
मनोज जरांगेंकडून पाडणारे मतदारसंघ
1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
5) जिंतूर, (परभणी जिल्हा)
6) औसा, (लातूर जिल्हा )
7) मुखेड -(नांदेड)
पाठिंबा देणारे मतदारसंघ
1) बदनापूर राखीव जालना जिल्हा
2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
हेही वाचा
दिवाळीचा फराळ अन् पाकिटात 3000 रुपये; रोहित पाटलांच्या मतदारसंघात गोंधळ, व्हिडिओ व्हायरल