Manipur Election Result 2022: मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 11, एनपीएफ  5, एनपीपी 10 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेंदर सिंग, विधानसभेचे अध्यक्ष वाय. खेमचंद टी.एच. वशविजित, मंत्री टीएच राधेश्याम आणि आमदार निमचा किपगेन यांच्यासह अनेक दिग्गज राजकारण्यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. 


मुख्यमंत्री एन बिरेन सिंग 8,574 मतांनी आघाडीवर 


निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हेंगांगमधील काँग्रेस उमेदवारापेक्षा 8,574 मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओ इबोबी सिंग थौबलमध्ये भाजपच्या एल बसंता यांच्यापेक्षा 472 मतांनी आघाडीवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष एन लोकेन सिंग हे भाजप उमेदवार थौनाओजम बसंता यांच्यापेक्षा नंबोलमध्ये 4,426 मतांनी पिछाडीवर आहेत.


निकालापूर्वी भाजप-काँग्रेसने केला होता हा दावा


निवडणुकीपूर्वी, मणिपूर भाजप अध्यक्ष ए शारदा देवी यांनी भाकीत केले होते की, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष एकूण 60 मतदारसंघांपैकी 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल. पक्षाने सर्व 60 जागा लढवल्या आहेत. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंग यांनी देखील विश्वास व्यक्त केला होता की, त्यांचा पक्ष राज्यात पुन्हा सत्तेवर येईल, कारण लोक भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांना कंटाळले आहेत.


2017 मध्ये काँग्रेस ठरला होता सर्वात मोठा पक्ष  


2017 च्या निवडणुकीत 28 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र भाजपने काँग्रेच्या काही आमदारांमध्ये फूट पाडून आपल्या सोबत घेतले आणि सत्ता स्थापन केली. दरम्यान, या निवडणुकीत जरी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी भाजपला मॅजिक फिगर 31 गाठण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागू शकते.