नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) काँग्रेस (Congress) पक्षाला 99 जागांवर विजय मिळाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) काँग्रेसला मोठा धक्का बसला. महाराष्ट्रात काँग्रेसने 288 जागांपैकी एकूण 101 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 16 जागांवरच विजय मिळवता आला. तसेच हरियाणामध्ये देखील काँग्रेसचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासमोरच नेत्यांना खडेबोल सुनावले.
महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह प्रमुख नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याची चर्चा होत होती. तर हरियाणातील पराभवामागे भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा, रणदीप सुरजेवाला यांच्यामधील संघर्ष कारणीभूत असल्याचे बोलले गेले. यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.
राष्ट्रीय नेत्यांवर किती काळ अवलंबून राहणार?
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, तुम्ही एकदिलाने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लढल्या नाहीत. एकमेकांविरोधात जाहीर आरोप-प्रत्यारोप करत राहिलात. आपापसांतील भांडणांमुळे काँग्रेसचा पराभव झाला. वातावरण आपल्या बाजूने होते तरीही त्याचा लाभ तुम्हाला घेता आला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय नेत्यांवर किती काळ अवलंबून राहणार? असा जाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांनी विचारला. बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता असे ज्वलंत प्रश्न होते, जातनिहाय जनगणनेचाही मुद्दा होता. केवळ राष्ट्रीय मुद्द्यावरून निवडणूक लढवता येत नाहीत. राज्यांचे स्थानिक मुद्दे काय आहेत? याकडे लक्ष देण्याची गरज होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे मुद्दे घेऊन प्रचाराची रणनीती आखण्याची गरज होती. पण यापैकी प्रदेश नेत्यांनी काहीही केले नाही, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधला.
आपणच आपले शत्रू बनलोय
ते पुढे म्हणाले की, तुमच्यामध्ये एकी नाही, नेत्यांच्या अंतर्गत संघर्षांमुळे संघटना कमकुवत झाली. प्रदेश स्तरावर संघटनेने अपेक्षित काम केलेले नाही, असे असेल तर निवडणुका कशा जिंकणार? असा सवाल उपस्थित करत संघटना मजबूत असेल तर पक्ष जिंकेल आणि पक्ष जिंकला तरच तुम्हीही टिकाल, असेही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले. आपणच आपले शत्रू बनलो आहोत. आपण नकारात्मक गोष्टी बोलू लागलो आहोत, आपल्यामध्ये नैराश्य आले आहे, असे खडेबोल त्यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.
आणखी वाचा