Mahim Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभेची चुरस संपूर्ण राज्यात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाची विधानसभा प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रंगणार आहे. अशातच राज्यातील सर्व लढतींपैकी सर्वाच चर्चेत असणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेली लढत म्हणजे, माहीम विधानसभा मतदारसंघातील. माहीम मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत दुसरे ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर, शिवसेनेकडून (शिंदे गट) विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. अशातच आपल्या पुतण्याविरोधात ठाकरे उमेदवार देणार की, नाही? अशा चर्चा रंगलेल्या, पण ठाकरे गटानं उमेदवार उतरवला. उद्धव ठाकरेंनी प्रभादेवी-माहीममधील त्यांचा हुकुमी एक्का महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीमची लढत तिरंगी होणार असल्याचं बोललं जात आहे. पण, माहीम विधानसभा मतदारसंघात एक मोठा ट्वीस्ट येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यासाठीच आज शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.
शिंदेंचा निरोप घेऊन, खास आमदार राज ठाकरेंकडे
माहीम मतदारसंघात सध्या तरी तिहेरी लढत होणार असंचं दिसतंय. पण आता सर्वात मोठा ट्वीस्ट येणार असल्याचं बोललं जात आहे. माहीममध्ये मनसेकडून अमित ठाकरे, महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि महाविकास आघाडीकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच आता या लढतीत मोठा ट्वीस्ट येणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. केसरकर आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल दोन मिनिटांची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांता निरोप घेऊन आल्याची माहिती मिळत आहे. दादर माहीम मतदारसंघमध्ये राज ठाकरे यांच्या मुलाविरुद्ध शिवसेना शिंदे गटांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशातच आता या भेटीमुळे माहीमध्ये नवा ट्वीस्ट येणार असल्याची माहिती मिळत आहे.
सदा सरवणकर उमेदवारीचं काय?
माहीम मतदारसंघाची लढत चुरशीची होणार आहे. माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उत्तर आहेत. अशातच सर्वात आधी चर्चा होती की, उद्धव ठाकरे पुतण्याविरोधात उमेदवार देणार नाही. पण, ठाकरेंनी उमेदवार रिंगणात उतरवला. आता तिरंगी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शीवतिर्थावर जाऊन शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. तसेच, मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन केसरकर राज ठाकरेंकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत खलबतं सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरू आहे? अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.