मुंबई: विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. वरळीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा पराभव करु शकेल, अशा तुल्यबल उमेदवाराचा सध्या शोध सुरु आहे. सध्या या मतदारसंघात (Worli Vidhan Sabha) भाजपकडून शायना एन सी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याशिवाय, शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांच्या नावाचाही सध्या विचार सुरु असल्याचे समजते.


महायुतीच्या जागावाटपातील सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार वरळी विधानसभेची शिंदे गटाच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे शायना एन सी यांना वरळीतून उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत मिलिंद देवरा यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते, असे वृत्त 'महाराष्ट्र टाईम्स'कडून देण्यात आले आहे. शायना एन सी आणि मिलिंद देवरा यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. हे दोन्ही नेते सुशिक्षित मतदारांना जवळचे वाटू शकतात. शायना एन सी या फॅशन डिझायनरही आहेत. शायना एन. सी. यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे शेरीफ होते.


याशिवाय, वरळी विधानसभा मतदारसंघासाठी आणखी एक शक्यता सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे वेळ पडल्यास वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे घराण्यातील एखाद्या व्यक्तीला रिंगणात उतरवले जाऊ शकते. ही व्यक्ती कोण असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, वरळीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना झाल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते. याशिवाय, वरळीतून लढण्यासाठी मनसेचे संदीप देशपांडेही इच्छूक आहेत. महायुती मराठी मतदारांमध्ये विभाजन करण्यासाठी त्यांचा वापर करुन घेणार की निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांच्याशी सल्लामसलत करुन देशपांडे यांना माघार घ्यायला लावणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


राज ठाकरेंसोबत फडणवीस-शिंदेंची खलबतं


वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी मध्यरात्री राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट पार पडल्याची चर्चा आहे. शिवडी, वरळी माहीम या तीन विधानसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अन्य ठिकाणी सहकार्य करावे, याबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.


आणखी वाचा


ठाकरे आणि भाजपमध्ये हातघाईची लढाई अन् मिलिंद नार्वेकरांच्या अमित शाहांना शुभेच्छा, चर्चांना उधाण


वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले