मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा राजकीय द्वंद्व रंगणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे भाजपविरोधात इर्ष्येने लढताना दिसून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला होता. मोदी-शाह यांच्यावर थेटपणे हल्ला चढवण्याची हिंमत दाखवणाऱ्या देशातील मोजक्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश होतो. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही ठाकरे Vs मोदी-शाह आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र, या सगळ्या धामधुमीत ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.  


सध्या उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात टोकाचे वाद आहेत. अलीकडच्या काळात दोन्ही नेत्यांकडून परस्परांवर बोचरी टीका करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि मोदी-शाह यांच्यात समेट होण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी दृष्टीपथात नाही. अशी सगळी परिस्थिती  असताना ठाकरे गटाचे विधानपरिषदचे आमदार, सचिव व उद्धव ठाकरेंचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी अमित शाह यांना एक्स पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


एकीकडे पक्ष अमित शहांच्या विरोधात लढत असताना नार्वेकरांनी दिलेल्या शुभेच्छांवरून कार्यकर्ते व नेते नाराज होण्याची शक्यता नाकारत येत नाही. कारण गेल्या काही महिन्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केलेली आहे. ही टीका नार्वेकर विसरले का ? शुभेच्छा द्यायची एवढी घाई का, अ्शी कुजबुज आता ठाकरे गटात सुरु असल्याचे कळत आहे.
 


उद्धव ठाकरे यांच्याकडून अमित शाहांवर सातत्याने टीका


गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसून आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मोदी-शाहांच्या भाजपचा उल्लेख 'दिल्लीतून चालून येणारी अफजलखानाची फौज', असा केला जातो. याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अहमद शहा अब्दालीचा वंशजही म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर अशाप्रकारची टीका करुन भाजपशी आपली लढाई 'आर या पारची' असल्याचे दाखवून दिले आहे. अशा परिस्थितीत मिलिंद नार्वेकर यांची कृती वादात सापडण्याची शक्यता आहे. बारा वाजल्यानंतर लगेचच काही वेळात अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची तत्परता मिलिंद नार्वेकर यांनी का दाखवली, असावी याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.




आणखी वाचा


अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?