कोल्हापूर : लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात पार पडलेल्या सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली.
शरद पवारांना फक्त खुर्ची दिसते : उद्धव ठाकरे
काँग्रेस राष्ट्रवादीतील बडे नेते आज शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मात्र आता भाजपमध्ये घेऊ नका, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच शरद पवारांना फक्त खुर्ची दिसते, बाकी त्यांना काही नको, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मला पळवापळवी करायची नाही म्हणून साताऱ्यासाठी नरेंद्र पाटलांना मागून घेतलं आहे. माथाडी कामगारांचा नेता मला दिल्लीला पाठवायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.
शिवसेना भाजप-युतीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील जनतेला आपल्याला एकत्र बघायचं होतं. त्यामुळे आज आपल्याला पाहण्यासाठी ते मोठ्या संख्येने इथे जमले आहेत. त्यामुळे ही युती का केली याचं कारण द्यायची आता मला गरज वाटत नाही.
महाआघाडील 56 पक्षांसाठी महायुतीचे पांडव पुरेसे : मुख्यमंत्री
महाआघाडीतल्या 56 पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीचा समाचार घेतला. कॅप्टनने सुद्धा माढातून माघार घेतली आहे. ओपनिंग बॅट्समनच म्हणतोय की मी बारावा गडी म्हणून काम करतोय. माढ्यातून माघार घेणाऱ्या शरद पवारांना टोला हाणण्याची संधी फडणवीसांनी सोडली नाही.
मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामतीच्या पोपटाला सांगू इच्छितो की आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही. तुमचे आधी विधानसभेत आणि मग लोकसभेत कपडे उतरले, मुंबई महापालिकेत उरलेलं लंगोटही उद्धव ठाकरेंनी उतरवलं. पोपटाला सल्ला देतो की मोदी सुर्यासारखे आहेत, त्यांच्यावर थुंकलात तर थुंकी तुमच्याच तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. कोणाची सुपारी घेण्यापेक्षा दुपारी घरी शांत बसा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात ते पाहा.
या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह इतर घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागा युतीच्या असतील : चंद्रकांत पाटील
लोकसभेची ही लढाई नसून देशाचं संरक्षण करणारी आणि जे देशाचं संरक्षण कधीच करु शकले नाही यांच्यातील ही लढाई आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांची केली आहे. ज्या चार जागांच्या जोरावर शरद पवार देशात राजकारण करतात, त्यातली एकही जागा यावेळेस जिंकू देणार नाही, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिलं.
पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागा युतीच्या असतील. अजूनही वेळ गेलेली नाही, शरद पवारांनी जसा स्वतः पळ काढला, तसं मुलीला आणि नातवाला तरी का पुढे करताय, उमेदवारी अर्ज मागे घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.