मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर नाराज इच्छुकांनी तिकीट न मिळण्याचे संकेत मिळताच इतर पक्षात उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये असा सल्ला मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला दिला आहे.


भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये


शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून भाजपला हा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तरीही तरुण तडफदार सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही आलात, आनंद आहे, अशा शब्दात शिवसेनेनं सुजय विखे पाटलांचं स्वागत केलं.


सुजयपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादी वगैरे पक्षांतील अनेकजण भाजपच्या दारात रांगा लावून उभे आहेत व त्याचा आनंद मुख्यमंत्री व इतर मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी अशीही घोषणा केली आहे की, राज्यात सात-आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होईल. चंद्रकांत पाटील यांच्या या संभाव्य भूकंपाच्या घोषणेनंतर राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन सतर्क झाले असेल. या भूकंपाचा केंद्रबिंदू नक्की कुठे आहे, भूगर्भातील हालचाली कुठे व कशा सुरू आहेत याचा अंदाज येत्या काही दिवसांत येईल. विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील व भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल. त्या दिशेने हिंदुत्ववादी विचाराचे धुरीण कामास लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असेल तर ते चुकीचे आहे, अशी भूमिका सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मांडली आहे.


वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे?


काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. काँग्रेस संस्कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी कालच टीका केली आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांना पर्यायी शब्द असल्याचे मोदी यांचे म्हणणे आहे. दुसरे असे की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘इनकमिंग’ आज आपल्या घरात लाभदायक वाटत असले तरी नंतर ते तापदायक ठरू शकते, असा सल्ला शिवसेनेनं भाजपला दिला आहे.



संबंधित बातम्या


काँग्रेसला धक्का, सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश


विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा?


राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट करावी, बाळासाहेब थोरात आक्रमक, विखे-थोरात वाद पुन्हा चव्हाट्यावर