शिरुर : भाजप आणि मित्रपक्षांची देशभरात हवा असताना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरुर मतदारसंघात मात्र धक्कादायक निकाल लागला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सलग तीन टर्म खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. अमोल कोल्हेंनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.


शिरुर मतदारसंघातील एकूण 12 लाख 86 हजार 226 मतांपैकी अमोल कोल्हे यांना 6 लाख 34 हजार 108 मते (49.19 टक्के) मते मिळाली. शिवाजीराव आढळराव पाटील यांना 44.63 टक्के म्हणजे 5 लाख 75 हजार 279 मतं मिळाली. या मतदारसंघात 23 उमेदवार उभे होते. कोल्हेंनी 58 हजार 878 मतांनी आढळराव पाटलांचा पराभव केला.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच अमोल कोल्हेंना खासदारकीचं तिकीट जाहीर झालं होतं. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच अमोल कोल्हे यांनी आढळरावांना कडवी झुंज दिली होती.

सेना-भाजप फूट पथ्यावर

शिरुरमधील शिवसेना-भाजप युतीमधील फूट शिवाजीरावांना महागात पडल्याची शक्यता आहे. 'शिवसेनेच्या या दोन्ही खासदारांनी गेली दोन वर्षे आरोपांची सरबत्ती केली. अशा उमेदवारांचा प्रचार आम्ही करणार नाही', अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी एकमताने घेतली होती. भाजप आमदार महेश लांडगे-आढळराव यांच्यात श्रेयावरुन रंगलेलं शीतयुद्ध सेनेच्या पराभवास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून रिंगणात उतरवलं आहे. गेल्या 15 वर्षात या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नव्हता, अशी टीकाही शिवाजीरावांनी केली होती. कोणी कितीही कोल्हेकुई करुदे, जिंकून मीच येणार, अशा शब्दात त्यांनी अमोल कोल्हेंना टोला लगावला होता.

शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. 2014 मधील निवडणुकीत तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

डॉ. अमोल कोल्हेंचा राजकीय प्रवास

डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. 19 मार्च 2014 रोजी कोल्हेंनी शिवसेनेचा भगवा हाती धरला होता. प्रत्यक्षात त्यावेळी ते मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी चालली नाही.

अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं होतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.

'आदरणीय उद्धवसाहेब, आपण माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली होती. वेळोवेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिलात. परंतु आपला विश्वास सार्थ ठरवण्यात मी अपयशी ठरलो. इतर कोणालाही दोष न देता मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' असं पत्र फेब्रुवारी 2017 मध्ये कोल्हेंनी लिहिलं होतं.

डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेमुळे ते नावारुपाला आले. कलर्स वाहिनीवर वीर शिवाजी ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली होती. छत्रपती संभाजी राजे मालिकेत सध्या डॉ. कोल्हे हे शंभूराजेंची भूमिका साकारत आहेत.