अहमदनगर : लोकसभा 2019 च्या निवडणुकीतील सर्वात चेर्चेतील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा जवळपास दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

अहमदनगरमध्ये ही निवडणूक सुजय विखेंच्या बंडामुळे प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटील यांना नगरकर काय कौल देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपला मुलगा सुजय विखेंसाठी अहमदनगरमध्ये प्रचारात उतरल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांचा दारुण पराभव केला.

अहमदनगर लोकसभा मतदार संघात दीड लाखापेक्षा जास्त आघाडी मिळाल्यानंतर सुजय विखे मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले. चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत असलेल्या विखे यांनी आपला विजय आजोबा बाळासाहेब विखे यांना समर्पित करत जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. आपल्या या विजयानंतर आता वडिलांना देखील हक्काने भाजपमध्ये घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत सुजय विखे यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर राज्यात ऐतिहासिक विजयमध्ये आपली नोंद होईल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांशी लावलेली पैज सुद्धा जिंकू असेसुद्धा सुजय विखे यांनी म्हणाले.

Loksabha Result | लोकसभेच्या निकालात कॉंग्रेसच्या पराभवाची कारणं- विखे पाटील | कौल मराठी मनाचा | ABP Majha



 यावेळी सुजय विखे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद यांच्यावरही टीका केली. विनाकारण ही निवडणूक प्रतिष्ठेची करून आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कडून केला गेली. तसेच माझे लाड करण्यासाठी कुठल्या आजोबांची गरज नसून जिल्ह्यातील जनतेनेच माझे लाड केले असल्याचा खोचक टोलाही सुजयने शरद पवारांना लगावला. 1991 साली आजोबाच्या पराभवाचा वचपा काढला असून 91 च्या उलट 19 ही संख्या होते आणि त्याचप्रकारे पराजयचा विजयात रूपांतर केले असल्याचेही सुजय विखे यांनी म्हणाले.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत 62.75% मतदान झालं होतं. 2014 मध्ये भाजपकडून दिलीप गांधी आणि राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांच्यात मुख्य लढत झाली होती. त्यावेळी भाजपच्या दिलीप गांधी यांनी राजीव राजळे यांना पराभूत करत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या वर्षी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकीट न देता काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी कडून सुधाकर आव्हाड आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर हे देखील निवडणूक लढवत होते.

अहमदनगर लोकसभा मतदार संघ एकूण मतदार

एकूण -18 लाख 54 हजार 248

पुरुष - 9 लाख 70 हजार 631

महिला- 8 लाख 83 हजार 529

इतर - 88

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा क्षेत्र :  एकूण 6 

राहुरी विधानसभा

पारनेर विधानसभा

श्रीगोंदा विधानसभा

नगर विधानसभा

पाथर्डी-शेवगाव विधानसभा

कर्जत-जामखेड विधानसभा