मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 349 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 86 जागांवर आघाडी मिळाली आहे. मुंबईतल्या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. मुंबईतील सहाही जागा शिवसेना भाजपला राखण्यात यश मिळाले आहे.
2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने मुंबईतील सहा जागा जिंकल्या होत्या. या जागा टिकवणे युतीसमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. हे आव्हान युतीने पेलले असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार सहाही जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
दक्षिण मुंबई : शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
दक्षिण मुंबई मतदार संघातून शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला आहे. मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून दक्षिण मुंबईची ओळख. खरंतर दक्षिण मुंबई या मतदारसंघावर काँग्रेसचच वर्चस्व होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण हेच वर्चस्व शिवसेनेने खोडून काढले आहे.
गिरणगावचा कष्टकरी मराठी, गिरगावचा मध्यमवर्गीय मराठी एकत्र आले आणि सोबत भाजपची अमराठी मते बोनस ठरल्याने अरविंद सावंत यांचा विजय सोपा झाला. या निवडणुकीत अरविंद सावंत यांना चार लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे तर मिलिंद देवरा यांना तीन लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींसारखा माणूस उघडपणे मिलिंद देवरा यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं समर्थन करतो तरीही अरविंद सावंत जिंकून येतात. त्यामुळे हा विजय एक चमत्कार मानायला हवा.
1952 पासून 1967 पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. जनता दलतर्फे (संयुक्त) लढून जॉर्ज फर्नांडिस यांनी काँग्रेसचा विजयाची साखळी तोडली आणि 1967 च्या निवडणुकीत विजय मिळवला. 1971 मध्ये ही जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली. 1977 पासून 1984 पर्यंत ही जागा भारतीय लोक दल आणि जनता पक्षाकडे होती. यानंतर 1984 पासून 1996 पर्यंत इथे काँग्रेसच्या मुरली देवरा यांचं वर्चस्व होतं. मग 1996 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन इथे निवडून आल्या. मात्र 1998 मध्ये मुरली देवरा विजयी झाले. मग 1999 मध्ये पुन्हा जयवंतीबेन मेहतांनी विजय मिळवला. 2004 मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि 2014 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. अरविंद सावंत यांनी सुमारे सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी मिलिंद देवरांचा पराभव केला.
दक्षिण-मध्य मुंबई : शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी
दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे पुन्हा निवडून आले आहे. राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना 4 लाख 23 हजार 743 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना 2 लाख 72 हजार 393 मतं मिळाली. एकंदरीतच या आकडेवारीवरुन एकनाथ गायकवाड शेवाळेंसमोर तगडं आव्हान उभं करण्यात अपयशी ठरले आहेत.
1952 पासून 1989 पर्यंत या जागेवर कधी काँग्रेस तर कधी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं वर्चस्व होतं. विशेष म्हणजे 1984 मध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. 1989 पासून 2009 पर्यंत म्हणजेच 20 वर्ष इथे शिवसेनेचा दबदबा होता. मोहन रावले यांनी सलग सहा निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा रोवून ठेवला. 2009 मध्ये काँग्रेसने आपली गमावलेली जागा परत मिळवली. पण 2014 च्या मोदी लाटेत ही जागा पुन्हा शिवसेनेच्या खात्यात आली. राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
उत्तर-मध्य मुंबई : भाजच्या पूनम महाजन विजयी
उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी भाजपच्या पूनम महाजन यांचा मार्ग खडतर केला होता. परंतु महाजन यांच्यावर पुन्हा एकदा लोकांनी विश्वास दाखवत विजयी केलं आहे. भाजपच्या पूनम महाजन यांना 4 लाख 86 हजार 672 मतं मिळाली तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 3 लाख 56 हजार 667 मतं मिळाली.
सुनील दत्त यांच्या निधनानंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त यांचा विजय झाला होता. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीच मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं. पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा जवळपास 1 लाख 86 हजार मतांना पराभव केला. त्याआधी 2009 मध्ये प्रिाया दत्त यांनी भाजपच्या महेश राम जेठमलानी यांना पराभूत केलं होतं.
या जागेवर कोणत्याही पक्षाचा दबदबा राहिलेला नाही. कधी इथे काँग्रेसचा विजय झाला तर कधी भाजपचा, विशेष म्हणजे आरपीआयचा उमेदवारही इथे विजयी झाला होता. 1999 मध्ये शिवसेनेच्या मनोहर जोशी तर 1998 मध्ये आरपीआयच्या रामदास आठवलेंनी ही जागा जिंकली होती. त्याआधी 1980 मध्ये जनता पक्षाच्या प्रमिला मधु दंडवते यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर मात केली होती. तर 1977 मध्ये या जागेवर सीपीआय (एम) यांनी अहिल्या रांगेकर यांना विजय मिळाला होता.
ईशान्य मुंबई : भाजपचे मनोज कोटक विजयी
जागावाटपात सर्वात हायव्होल्टेज ड्रामा झालेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या मनोज कोटक यांनी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना मागे टाकत विजय मिळवला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून मनोज कोटक यांना 5 लाख 14 हजार 599 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांना 2 लाख 88 हजार 113 मतं मिळाली.
मराठीचा मुद्दा उचलून पाटील यांनी प्रचार केल्यामुळे कोटक यांचा मार्ग खडतर झाला होता. परंतु शिवसैनिकांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे कोटक यांनी विजय मिळवला.
1980 मध्ये या जागेवर जनता पक्षाचे सुब्रमण्यम स्वामी खासदार होते. यानंतर 1984 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1989 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन मेहता, 1991 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1996 मध्ये भाजपचे प्रमोद महाजन, 1998 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1999 मध्ये भाजपचे किरीट सोमय्या, 2004 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयदिना पाटील आणि 2014 मध्ये भाजपचे किरीट सोमय्या खासदार होते. अशाप्रकारे 35 वर्षांमध्ये हा मतदारसंघ सातत्याने परिवर्तनाचा साक्षीदार राहिला होता.
उत्तर पश्चिम मुंबई : शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी
राहुल शेवाळे आणि अरविंद सावंतांप्रमाणे शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनीदेखील त्यांचा गड राखण्यात यश मिळवले आहे. कीर्तिकरांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांना धूळ चारली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना 5 लाख 55 हजार 982 मतं मिळाली तर काँग्रेसच्या संजय निरुपम 3 लाख 4 हजार 55 मतं मिळाली.
एकेकीळी देशातील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ. अभिनेत्यापासून नेते बनलेले सुनील दत्त यांच्यामुळे हा मतदारसंघ प्रसिद्ध झाला होता. सुनील दत्त यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथे 18 वर्ष खासदार होते. या जागेवर अनेक रोमांचक लढतीही झाल्या. या मतदारसंघावर सिनेसृष्टीतील लोकांचाच दबदबा राहिला. पण शिवसेनेने हा दबदबा मोडून काढला आणि 2014 मध्ये इथे विजय मिळवाला. 2014 मध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर इथे विजयी झाले.
1967 पासून 1977 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे होती आणि त्यानंतर ख्यातनाम वकील राम जेठमलानी आधी जनता पक्ष मग भाजपचे खासदार बनले. यानंतर1984 पासून 1996 पर्यंत काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांचं मतदारसंघावर वर्चस्व राहिलं. मात्र 1996 आणि 1998 मध्ये शिवसेनेलाही इथे विजय मिळाल. मग 1999 मध्ये ही जागा पुन्हा सुनील दत्त यांच्याकडे आली. 2005 मध्ये सुनील दत्त यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त इथून खासदार झाल्य. 2009 मध्येही ही जागा काँग्रेसकडेच होती. पण 2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी या जागेवर विजय मिळवला.
उत्तर मुंबई : भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी
रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर यांनी भाजपच्या गोपाळ शेट्टींसमोर तगडे आव्हान निर्माण केलं पण त्याचा मतात रुपांतर होताना आपल्याला दिसलं नाही. उत्तर मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टींनी त्यांचा गड राखला आहे. गोपाळ शेट्टींना 7 लाख 5 हजार 555 मतं मिळाली तर काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना 2 लाख 40 हजार 956 मतं मिळाली.
उत्तर मुंबई -लोकसभा मतदारसंघाचा मूड आता परिवर्तन झाला आहे. एकेकाळी इथे भाजपचे राम नाईक पाच वेळा खासदार होते. मग त्यांना अभिनेता गोविंदाकडून आव्हान मिळालं. गोविंदाने इथे काँग्रेसचा झेंडा फडकावला. नंतर काँग्रेसकडूनच संजय निरुपम इथे जिंकले. मग 2014 मध्ये मोदी लाटेत केवळ संजय निरुपम यांचाच पराभव झाला नाही तर गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसला रसातळाला पाठवलं. काँग्रेसचा इथे दारुण पराभव झाला.
1952 मध्ये या जागी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या श्रीपाद अमृत डांगे यांनी जिंकली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी इथे विजय मिळवला. तर एकदा ही जागा भाजपच्या खात्यात गेली होती. 1989 पासून 2004 पर्यंत सलग तीन लोकसभा निवडणुकीत राम नाईक यांचा इथे विजय झाला होता. 2004 मध्ये त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढलेला अभिनेता गोविंदाकडून आव्हान मिळालं, ज्यात गोविंदाने त्यांच्यावर मात केली. यानंतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले संजय निरुपम 2009 मध्ये इथून खासदार बनले. त्यांनीही भाजपच्या राम नाईक यांना कमी फरकाने पराभूत केलं. 2014 मध्ये मोदी लाटेत ही जागा पुन्हा एकदा भाजपकडे आली. इथे गोपाळ शेट्टींना तब्बल साडे चार लाख मतांनी विजय मिळाला.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत काँग्रेसला क्लीन स्वीप, शिवसेना-भाजपने सर्व जागा राखल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2019 02:56 PM (IST)
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 343 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 86 जागांवर आघाडी मिळाली आहे. 112 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -