Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election) मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, निकालाआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवलेल्या संभाव्य विजयी उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे संभाव्य विजयी उमेदवार म्हणून बघितले जात आहे. तर करमाळा विधानसभा मतदारसंघात त्यांचे चुलते संजयमामा शिंदे यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवली होती. या दोन्ही नेत्यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन येत आहेत. 


शिंदे कुटुंबावर महाविकास आघाडी आणि महायुतीचं लक्ष


माढा आणि करमाळा या दोन मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेल्या शिंदे कुटुंबावर महाविकास आघाडी व महायुतीची नजर आहे. तसेच सांगोल्यातील शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनांही आपल्या गोटात वळवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरु आहेत. माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवीत असलेले रणजित शिंदे हे गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांचा फोन बंद होता. मात्र त्यांच्यासाठी त्यांचे वडील आमदार बबनदादा शिंदे आणि चुलते आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे फोन येण्यास सुरुवात झाल्याची माहिकी रणजित शिंदे यांनी दिली. यामध्ये महायुतीकडून स्वतः मुख्यमंत्री संपर्क ठेवत असल्याचीही चर्चा सुरु आहे. तर महाविकास आघाडीकडून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आपल्याला नेमके कोण फोन करते याबाबत कोणत्याही संभाव्य आमदाराने नावे घेतली नसली तरी दोन्ही बाजूचे फोन येत असल्याचे सांगण्यात आले आहे. 


विधानसभेसाठी उद्या मतमोजणी होणार


उद्या राज्यातील विधानसभेसाठी मतमोजणी होत असताना संभाव्य विजय होणाऱ्या अपक्ष उमेदवारांवर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून संपर्क ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  सोलापूर जिल्ह्यातील माढा व करमाळा येथील शिंदे कुटुंबावर सर्वांची नजर आहे. विधानसभेच्या मतदानानंतर ज्या पद्धतीचे कल विविध वाहिन्यांनी जाहीर केलेले आहेत ते पाहता महायुती अथवा महाविकास आघाडी या दोघांनाही सरकार स्थापन करण्यासाठी अपक्षांची गरज भासणार असे चित्र आहे. त्यामुळे सध्या विजयी होऊ शकणाऱ्या अपक्षांना दोन्ही बाजूने आपल्या आघाडी तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. 


सांगोल्याचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांनांही फोन 


दरम्यान, सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे देखील संभाव्य विजयी उमेदवार म्हणून बघितलं जात आहे. आपल्या गोटात ओढण्यासाठी महाविकास आघाडी व महायुती दोघेही प्रयत्नशील आहेत. सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत झाली होती. सध्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनाही दोन्ही बाजूनी फोन येण्यास सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली आहे. सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे महाविकास आघाडीचे असल्याची भूमिका सध्या महाविकास आघाडीचे नेते म्हणत असले तरी आपला निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि मतदारसंघाच्या विकास डोळ्यासमोर ठेवून घेतला जाईल अशी ठाम भूमिका डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली आहे.


महत्वाच्या बातम्या:


अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन