पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी भेटीगाठी, पक्षांतर, दौरे, चर्चा, मुलाखती यांना वेग आला आहे, असं असतानाच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं तिकिट मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अनेक नेते चर्चा करत आहेत. चिंचवड विधानसभेचं तिकिट मिळविण्यासाठी नाना काटे, राहुल कलाटे आणि चंद्रकांत नखाते यांनी शरद पवारांची भेट घेतली. 


या भेटीत तिघांना एकमत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. त्यामुळं या तिघांचं एकमत झालं नाही तर पवार स्वतः एकाच्या नावाची घोषणा करणार आहेत. मात्र राहुल कलाटेंना तिकीट मिळालं तर नाना काटे काय भूमिका घेणार? आणि नाना काटेंना उमेदवारी मिळाली तर राहुल कलाटे पुन्हा बंडखोरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याबद्दल नाना काटे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, जयंत पाटील, सुप्रिया सुळेंचा फोन आला, त्यांनी वाय,बी, सेंटर येथे बोलावलं. त्याठिकाणी आम्हाला प्रत्येकाला माहिती, पार्श्वभूमी विचारली. प्रत्येकांने आपल्या मतदारसंघाची माहिती दिली. त्यानंतर आमची शरद पवारांची चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, हा मतदारसंघा कोणत्या पक्षाला द्यायचा, पण त्यांनी म्हटलं की, तुमच्या तिघांमध्ये जर चर्चा झाली आणि त्यानंतर तुम्ही ठरवलं तर सोईचं होईल, असंही यावेळी नाना काटे म्हणाले. 


तर भेटीवेळी आम्ही शरद पवारांना सांगितलं तुम्ही याबाबतचा निर्णय घ्या, आमच्या तिघांपैकी तुम्ही कोणाला उमेदवारी देणार ते तुम्हीच ठरवा. योग्य तो निर्णय घ्या, गेली पोटनिवडणुक, मते,पार्श्वभूमी याबाबतच्या चर्चा करून तुम्ही निर्णय घ्या असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाल्याचं चित्र आहे. महायुतीकडून भाजपने याठिकाणी आपला उमेदवार जाहीर केला आहे. पहिल्या यादीमध्ये शंकर जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून तीन जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याजागी भाजपमधील शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र भाजपमधूनच शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते आदी इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे जगतापांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 


महायुती मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नाना काटे देखील इच्छुक आहेत. ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काटे हे शरद पवार गटात जाण्यासाठी चाचपणी करत आहेत. त्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष लढणारे शिवसेना ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी देखील आहे. त्यांच्यासोबतच राहुल कलाटे आणि चंद्रकांत नखाते देखील शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.