नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) चर्चा आहे. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीदरम्यान येवला आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाचा पहिला कल हाती आला आहे. मतमोजणीच्या पहिल्याच कलात येवल्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ, मालेगाव मध्य मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आघाडीवर आहेत.
छगन भुजबळ आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला म्हणून येवला विधानसभा मतदारसंघाची (Yeola Assembly Constituency) ओळख आहे. महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे. तर पहिल्या कलानुसार या मतदारसंघातून छगन भुजबळ आघाडीवर आहेत.
मालेगाव बाह्यमधून भुसेंची आघाडी
तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात (Malegaon Outer Assembly Constituency) शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार दादा भुसे (Dada Bhuse) हे सलग पाचव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. मात्र यंदा दादा भुसे यांना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे (Adway Hiray) यांचे तगडे आव्हान आहे. भुसे-हिरे या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच पहिला कल हाती आला असून दादा भुसे आघाडीवर आहेत.
सिन्नरमधून कोकाटे आघाडीवर
सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Faction) उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. सांगळे यांच्या प्रवेशामुळे ही लढत चुरशीची झाली आहे. आता पहिला कल हाती आला असून महायुतीचे माणिकराव कोकाटे आघाडीवर आहेत.
नाशिक पूर्व
राहुल ढिकले, भाजप - आघाडीवर
नाशिक मध्य
देवयानी फरांदे, भाजप - आघाडीवर
दिंडोरी
नरहरी झिरवाळ, अजित पवार गट आघाडीवर
आणखी वाचा