दौंड: विधानसभेच्या उमेदवारीवरून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यात दौंड आणि पुरंदरमध्ये महायुतीत अजित पवार गटाकडून भाजप आणि शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात थेट एबी फॉर्म देऊन बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात दौंड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी वैशाली नागवडे यांनी केलेली आहे. 


उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ४ तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण आम्ही जागा मिळावी यावरती ठाम आहोत असं वैशाली नागवडे म्हणतात. भाजपचे नेते सातत्याने महायुती धर्म निभाव असं सांगतात. पण दौंड तालुक्याचा विकास अजित दादांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं वैशाली नागवडे म्हणाल्या.


दौंड विधानसभेला महायुतीचा धर्म पाळावा - राहुल कुल


दौंड विधानसभेसाठी राहुल कुल यांनी भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कुल यांनी गावोगावी भेट देत प्रचार दौरा सुरू केला आहे. दौंडची जागा भाजपकडे गेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू सहकारी वीरधवल जगदाळे यांना पक्षाने एबी फॉर्म देत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे दौंडमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे. लोकसभेला आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे. विधानसभेला देखील त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा आहे. आमच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा धर्म पाळावा हे अपेक्षित आहे. वरिष्ठ स्तरावर हा निर्णय होईल असे अपेक्षित आहे अशी अपेक्षा राहुल कुल यांनी व्यक्त केली आहे.