नागपूर: विधानसभा निवडणुकीत मतदारांनी हिंदू हितासाठी मतदान करावे, यासाठी राज्यात साधुसंत आणि धर्माचार्य कामाला लागले आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेने (VHP) जोरदार प्रयत्न सुरू केले असून राज्यभरात 25 पेक्षा जास्त ठिकाणी "संत संमेलन" (Sant Sammelan) आयोजित करण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी ठिकाणी हे संत संमेलन पार पडले असून लवकरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक ठिकाणी हे संत संमेलन होणार आहेत.


संत संमेलनाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद त्या परिसरातील साधुसंत व धर्माचाऱ्यांना एकत्रित करून या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान आणि हिंदू हितासाठी मतदान (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होणे का आवश्यक आहे, हे संतांना समजावून सांगत आहे. पुढे महिनाभरात या संतांनी त्यांच्या नियमित प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून येणारे भाविक आणि परिसरातील मतदारांना मतदान करताना हिंदू हितांचा मुद्दा लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन करायचे आहे. 


विश्व हिंदू परिषदेच्या साधुसंतांच्या माध्यमातून हिंदू हितासाठी मतदान करण्यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठ्या संख्येने साधुसंत आणि धर्माचाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात एका विशिष्ट समुदायाने काँग्रेसला एक गठ्ठा मतदान करत वोट जिहाद केल्याचा आरोप खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता विश्व हिंदू परिषदेचा हिंदू हितासाठी मतदानाचा आग्रह आणि त्यासाठी साधुसंत धर्माचाऱ्यांना मैदानात उतरवण्याची प्रक्रिया वोट जिहादला वेगळ्या पद्धतीने उत्तर आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.


विश्व हिंदू परिषदेकडून कुठे-कुठे संत संमेलनाचे आयोजन?


नागपूर, अकोला, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, अकोले, पाथर्डी, सिन्नर, पुणे, सातारा, कर्जत, आळंदी, कराड, अहिल्यानगर, पंढरपूर याठिकाणी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान एकाच टप्प्यात पार पडणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना फारशी सक्रिय दिसून आला नव्हता. मात्र, आता हिंदू मतांच्या एकीकरणासाठी विश्व हिंदू परिषदेने कंबर कसली आहे. याचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती फायदा होणार, हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.


आणखी वाचा


थेट दिल्लीतून आदेश! मविआतील गुंता सोडवण्याची जबाबदारी काँग्रेसच्या 'या' नेत्यावर; ठाकरे, पवारांशी चर्चा करणार!