Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी (Ajay Chaudhari) माझ्यासोबत राहिले. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देत आहोत', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिक्कामोर्तब केलं. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) हे शब्द ऐकून सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि ते मातोश्रीबाहेर पडले. दरम्यान सुधीर साळवी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार आहे.
मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघ शिवडीतून ठाकरेंनी पुन्हा एकदा अजय चौधरींचा मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे सुधीर साळवी यांना आता विधानसभेचं मैदान गाठता येणार नाही. शिवडी मतदारसंघात अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्या नावाचा बराच संभ्रम होता. पण अखेर मातोश्रीवर निर्णय घेत शिवडी मतदारसंघातून अजय चौधरींनाच उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.
म्हणून अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब
शिवसेनेत फूट पडली त्यावेळी आमदार म्हणून अजय चौधरी हे ठाकरेंसोबतच राहिले.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लालबाग-परळसारख्या भागात सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची उत्सुकता होती. मात्र आता अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. असं असलं तरीही मी पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याची ठाम भूमिका सुधीर साळवी यांनी घेतली आहे.
सुधीर साळवी यांनी काय म्हटलं?
दरम्यान मातोश्रीने हा निर्णय दिल्यानंतर सुधीर साळवी उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला आणि ते बाहेर पडले. त्यानंतर एबीपी माझाला सुधीर साळवींनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे अजय चौधरींना जरी उमेदवारी दिली असली तरीही सुधीर साळवी हे पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठीच काम करणार असल्याचं स्पष्ट झालंय.
शाखाप्रमुख ते पदाधिकाऱ्यांचा सुधीर साळवींना होता पाठिंबा
शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुनं कौल दिला. परंतु अजय चौधरी जुने नेते आणि बंडखोरीत उद्धव ठाकरेंसोबत थांबल्यानं त्याचंही मातोश्रीवर महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे मातोश्रीनेही आता अजय चौधरींच्याच नावावर शिक्कामोर्तब केलंय दरम्यान शिवडी विधानसभेत मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.