पुणे: अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके आत्तापर्यंत भाजपा संपली असं म्हणायचे. पण आज ते भाजपकडे विनवणी करत आहेत, स्वतः विरोधात उमेदवार उभा करा. अशी मागणी करत आहेत. मावळ पॅटर्नमुळं शेळकेंवर ही वेळ आली आहे. असं म्हणत भाजपचे नेते रवी भेगडेंनी शेळकेंची खिल्ली उडवली आहे. रवी भेगडेंना भाजपने एबी फॉर्म देऊन ही त्यांनी जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असा आरोप शेळकेंनी केला. तसेच भाजपाला या मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, असा इशारा ही शेळकेंनी थेट भाजपाला दिला आहे. यानंतर रवी भेगडेंनी सुद्धा आमचं ठरलंय, काहीही झालं तरी आम्ही बंडखोर बापू भेगडेंना आमदार केल्याशिवाय मागे हटणार नाही. आजवर भाजपा संपली असं म्हणणाऱ्या शेळकेंना भाजपकडे मदतीची याचना करावी लागत आहे. मावळ पॅटर्नचे हे परिणाम असल्याचं नमूद करत रवी भेगडेंनी शेळकेंची खिल्ली उडवली. 


काय म्हणालेत सुनील शेळके?


सुनील शेळके एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं आपण मैत्रीपुर्ण लढत करत असताना आम्ही रविंद्र भेगडे यांना उमेदवारी अर्ज भरण्याला परवानगी दिलेली आहे. त्यांना आम्ही एबी फॉर्म देत आहोत. मात्र, त्यांनी फॉर्म भरला नाही. भाजपाचा कार्यकर्ता जर तुम्हाला उमेदवार म्हणून चालत असता किंवा भाजपला ही जागा मिळाली असती, महायुतीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन येत असेल किंवा कमळ चिन्ह घेऊन येत असेल दोन्ही पैकी कोणताही उमेदवार विजयी झाला तर त्याच समाधान आम्हाला मिळालं असतं. मात्र, महायुतीचा उमेदवार उभारला नसून ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ते पाठिंबा देऊन ते काम करत आहेत.


आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. आपल्याला मावळ तालुक्यात चुकीचा पायंडा पाडून नका.त्याचे परिणाम मावळ सोडून इतर तालूक्यात देखील झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून माझी भाजप नेत्यांना आणि वरिष्ठांना विनंती आहे, त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, आपली भूमिका स्थानिक नेत्यांना स्पष्ट करण्याची सूचना द्यावी असं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे. 


रवी भेगडे काय म्हणालेत?


कोण रवी भेगडे पासून रवी आप्पा भेगडे, रविंद्र भेगडे असा बदल झाला आहे का नाही ते तपासावं, भाजप संपली म्हणणारे आज मदत मागत आहेत, उमेदवारी देण्यात यावी म्हणत आहेत. आज ते भाजपकडे विनवणी करत आहेत, स्वतः विरोधात उमेदवार उभा करा. अशी मागणी करत आहेत. मावळ पॅटर्नमुळं शेळकेंवर ही वेळ आली आहे. आजवर भाजपा संपली असं म्हणणाऱ्या शेळकेंना भाजपकडे मदतीची याचना करावी लागत आहे. मावळचा स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही एकत्र आहोत.आमचं ठरलं आहे, त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत, असं रवी भेगडेंनी म्हटलं आहे.