पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी मावळमध्ये सर्व पक्षीयांनी एक वेगळंच समीकरण राबवलं आहे. मात्र या समीकरणामुळं लोणावळा भाजपात उभी फूट पडली आहे. आम्ही महायुतीचे धर्म पाळून सुनील शेळकेंचा प्रचार करू, असं म्हणत आमचा मावळ पॅटर्नला पाठिंबा नसल्याचं लोणावळा भाजप शहराध्यक्ष अरुण लाड यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, आमच्यात दोन गट पडल्याचं ही त्यांनी मान्य केलं आहे. दुसरा गट हा बाळा भेगडेंच्या नेतृत्वात बंडखोर बापू भेगडेंचा प्रचार करत असल्याची कबुली ही लाड यांनी दिली आहे. शेळकेंना विरोध करण्याच्या नादात लोणावळा भाजपमध्ये अशी फूट पडली असून विधानसभेनंतर याचे पडसाद कसे उमटतात, याकडे ही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सध्या तालुक्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत. एक आहे महायुतीचा उमेदवार सुनील शेळके दुसरे आहेत अपक्ष उमेदवार भेगडे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आम्ही लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमचा निवडणुकीसाठीचा पाठिंबा हा महायुतीला असणार आहे. त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना बहुमताने निवडून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आम्ही सर्वजण लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी माहितीच काम करणार आहोत असेही ते यावेळी म्हणालेत. फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीचा धर्म आम्ही पाळत आहोत याबाबतचा निर्णय आम्ही सर्वांनी चर्चा करून घेतलेला आहे, असंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे.
मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही मनसे पाठिंबा
मावळ पॅटर्नला राज ठाकरेंनी ही पाठिंबा दर्शवला असून हा पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपाचे नेते बाळा भेगडेंनी स्वतः राज ठाकरेंची भेट घेतली. अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी बाळा भेगडे मैदानात उतरले आहेत. बंडखोर बापू भेगडेंसाठी बाळा भेगडे जंग जंग पछाडत आहेत. शरद पवार गटासह सर्वपक्षीयांनी बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवला आहे. अशातच बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेत, मनसेच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
सुनील शेळकें विरुद्ध बाळा भेगडेंची ठोकला शड्डू
पिंपरी चिंचवडमध्ये नाना काटेंनी बंडखोरी मागे घेताना मावळ पॅटर्नमधून भाजपने पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. पण हा दावा भाजप नेते बाळा भेगडेंनी खोडून काढला. अगदी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंचा प्रचार केला तरी स्थानिक भाजपा आमचे बंडखोर उमेदवार बापू भेगडेंचा प्रचार करणार, अशी आक्रमक भूमिका बाळा भेगडेंनी घेतली आहे. त्यामुळे, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतरही मावळमध्ये सुनील शेळकेंविरुद्ध भाजप काम करणार की शेळकेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार हे पाहावे लागेल.