मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर पक्ष उमेदवारांची नावे कधी जाहीर करणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर सोमवारी एका वेगळ्याच कारणामुळे शिवसेना नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली. ठाकरे गटाकडून (Thackeray Camp) प्रामुख्याने मुंबईतील अनेक जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. मात्र, अनेक मतदारसंघांमध्ये ठाकरे गटातील एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छूक आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी आज मातोश्रीवर आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून काही तोडगा निघणार का आणि संबंधित नेते समाधानी वृत्तीने माघारी जाणार का, हे पाहावे लागेल. 


चेंबूर, शिवडी, भायखळा,कुर्ला,मागाठाणे, घाटकोपर पश्चिम या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छूक असल्याने ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. या सर्व उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. त्यानुसार शिवडी विधानसभेचे विद्यमान आमदार अजय चौधरी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघातून लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे चेंबूर मतदारसंघातील विद्यमान प्रकाश फातर्फेकर हेदेखील मातोश्रीवर उपस्थित आहेत. त्यांच्या मतदारसंघातून माजी नगरसेवक अनिल पाटणकर इच्छूक आहेत. शिवसेना पक्षातील बंडानंतर अजय चौधरी आणि प्रकाश फातर्फेकर हे दोन्ही आमदारांनी ठाकरेंशी निष्ठा कायम राखली होती. दरम्यान, काहीवेळापूर्वीच सुधीर साळवी हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणणार का, हे पाहावे लागेल.


चेंबूर, शिवडी, भायखळा,कुर्ला,मागाठाणे,घाटकोपर पश्चिम इथल्या उमेदवारीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे.  भायखळ्यातून रमाकांत रहाटे, मनोज जामसुतकर, किशोरी पेडणेकरे हे तीन उमेदवार इच्छूक आहेत. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून सुरेश पाटील आणि संजय भालेवर यांच्यात चुरस आहे. तर मागाठाणे विधानसभा मतदारसंघात संजना घाडी आणि उदेश पाटकर हे दोघे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. याशिवाय, कुर्ला मतदारसंघातील प्रविणा मोरजकर यादेखील मातोश्रीवर दाखल  झाल्या आहेत.


आणखी वाचा


शिवडीत ठाकरेंकडून अजय चौधरी की सुधीर साळवी?; उमेदवारी जाहीर होण्याआधीच समर्थकांकडून प्रचार


लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?