Satej Patil : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राज्यातील जागावाटपावरून (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अक्षरश: काथ्याकूट सुरु आहे. अनेक जागांवर दोन्ही आघाड्यांमधील पक्षांकडून हेवेदावे सुरू आहेत. त्यामुळे अजूनही उमेदवार निश्चिती होऊ शकलेली नाही. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District Assembly Constituency)  महाविकास आघाडीमधील स्थिती आता स्पष्ट झाली आहे. काँग्रेसच्या दोन याद्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन याद्या आल्यानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटप कसं असेल? याचं चित्र स्पष्ट झालं आहे.


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये चार ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीन ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर ठाकरे गटाकडून दोन ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर उत्तरची अजूनही प्रतीक्षा असली तरी तो मतदारसंघ काँग्रेसच्याच वाट्याला जाईल अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या जागा वाटपामध्ये विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी बाजी मारली आहे. 


जागावाटपात काँग्रेसची पंचमी सतेज पाटलांची बाजी 


महाविकास आघाडीच्या जागा वाटप फाॅर्म्युलामध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा बैठकांचा सिलसिला कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत ते दिल्लीपर्यंत होता. त्यामुळे आपल्या बालेकिल्लातील जागा काँग्रेसकडे अधिक राहतील याची पुरेपूर काळजी सतेज पाटील यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदर्भातील जागांवरून राज्यातील काँग्रेस नेत्यांवर आगपाखड केली असताना दुसऱ्या बाजूने सतेज पाटील यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात बाजी मारली आहे. सतेज पाटील यांचे ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी सुद्धा असलेले व्यक्तीगत संबंध त्यांच्यासाठी फलदायी ठरले आहेत. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, करवीरमधून स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील, हातकणंगले मतदारसंघातून राजूबाबा आवळे यांना संधी मिळाली आहे. शिरोळमधून गणपतराव पाटील रिंगणात आहेत. कोल्हापूर उत्तरमधील उमेदवाराची प्रतीक्षा आहे. 


शिरोळ मतदारसंघ सुद्धा खेचून आणला 


शिरोळमध्ये ठाकरे गटाकडून उल्हास पाटील असणार की फक्त काँग्रेसकडेच उमेदवारी मागितलेल्या दत्त कारखान्याच्या गणपतराव पाटील यांना संधी मिळणार? याकडे लक्ष होते. दुसऱ्या बाजूने शिरोळसाठी महाविकास आघाडीमध्ये कमालीचे आग्रही असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याशी थेट बोलणी असतानाही शिरोळची जागा सुद्धा पदरात पाडून घेण्यात सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढलेली पक्षीय ताकद आणि असलेला जनसंपर्क कामी आल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कोल्हापूर उत्तरची जागा सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्मुलानुसार काँग्रेसकडेच राहील अशीच चिन्हे आहेत. मात्र, या ठिकाणीचा उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीमध्ये कदाचित कोल्हापूर उत्तरचा समावेश असू शकतो. मात्र ही जागा काँग्रेसकडेच जाईल यामध्ये शंका नाही. 


राहुल गांधींचा दौरा यशस्वी करून दाखवला 


सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करून दाखवला. या दौऱ्यामध्ये सुद्धा अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात सतेज पाटील यांचा मोलाचा वाटा होता. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये उचगाव गावामध्ये एका दलित कुटुंबाच्या घरी राहुल गांधी यांना नेत सतेज पाटील यांनी खेळी केली होती. कोल्हापूर दक्षिणमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतं. राहुल गांधी यांच्या कृतीने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात संदेश देण्यात ते यशस्वी झाले. दुसरीकडे, बावड्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जंगी अनावरण सोहळा करत कोल्हापूर उत्तरमध्ये सुद्धा वातावरण निर्मिती केली. त्यानंतर आता जागावाटपामध्ये सुद्धा आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली आहे.


कोल्हापूर लोकसभा सुद्धा काँग्रेसकडे खेचला, शाहू महाराज खासदार झाले 


लोकसभा निवडणुकीतही सतेज पाटील यांनी अनपेक्षित डाव टाकताना शिवसेना ठाकरे गटाकडून  कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला होता. शाहू महाराज यांना थेट उमेदवारी देत त्यांच्या विजयाची सुद्धा जबाबदारी उचलली. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी दिलेली निर्णायक ताकद सुद्धा सतेज पाटील यांच्या शंभर हत्तीचे बळ होते. कोल्हापूर लोकसभेला सहापैकी पाच मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती. त्यामुळे ते मताधिक्य कायम राखून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी सुद्धा सतेज पाटील यांचीच असणार आहे. संस्थात्मक राजकारण, तंत्रज्ञानस्नेही, उत्तम संघटन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे सतेज पाटलांची उजवी बाजू आहे. 


काँग्रेसकडून नेतृत्वाची दखल 


सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. 2010-14 आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशाविविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. मार्च 2023 मध्ये काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. महाविकास आघाडीचा पॅटर्न त्यांनी राज्यात पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये राबवत यशस्वी करून दाखवला होता.  कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडील पाच जागा आणि सहकारी पक्षांच्या पाच जागा सुद्धा विजयी करण्यात सतेज पाटील यांनाच आव्हान पेलावं लागणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या