पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्र लगबग सुरू झाल्याचं चित्र आहे. उमेदवार चाचपणी, जागावाटप अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. अशातच आज बारामती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून संदीप चोपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात १०९ मतदारसंघात पक्षाचे उमेदवार देणार असून त्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
बारामतीत पवार विरूध्द पवार अशा लढतीची शक्यता
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील बारामती मतदारसंघात पवार विरूध्द पवार अशा लढतीची शक्यता आहे. बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे युगेंद्र पवार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून राकीय वर्तुळाक सुरू आहे. बारामतीमधील निवडणूक ही लोकसभेसारखीच विशेष आणि सर्वांतं लक्ष वेधून घेणारी असणार आहे, त्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण असेल, याची घोषणा शरद पवारच करतील, असे या पक्षाच्या बड्या नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना अजित पवार आणि समर्थक आमदार खासदारांनी भाज शिवसेनेसोबत युतीत जाण्याचा निर्णय घेतला. पक्ष फुटीनंतर बारामती मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीची लढत अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच शरद पवार गटाचा उमेदवार खुद्द शरद पवार जाहीर करणार असल्याने सस्पेन्स कायम आहे, तर दुसरीकडे मात्र, ‘मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या, बारामतीमधून निवडणूक लढवण्यात रस राहिलेला नाही,’ असे विधान करून बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवार यांनी आधी बोलताना दिले होते. त्यानंतर बारामतीतील कार्यकर्त्यांनी तुम्हीच उभे राहा असा हट्ट धरला होता, त्यांची गाड्या देखील अडवल्या होत्या.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वेळीही बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांनाच संधी द्यावी, अशी आग्रही मागणी समर्थकांच्या शिष्टमंडळाने केली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांसह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही युगेंद्र हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे बारामतीची लढत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशीच होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, लोकसभेवेळी अजित पवारांना मोठा दणका बसला होता, यावेळी अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.