मुंबई: एक्झिट पोल्स, राजकीय पंडितांची भाकितं, राजकारण्यांची आकलनबुद्धी आणि सामान्य नागरिकांची विचारशक्ती या सगळ्याला सपशेल चकवा देत शनिवारी महाराष्ट्रात  विधानसभा निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल नोंदवले गेले. महायुती आणि भाजपच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडी अक्षरश: भुईसपाट झाली. राज्यातील एकूण 288 मतदारसंघांपैकी 137 मतदारसंघांमध्ये भाजपने एकहाती विजय मिळवला. तर शिंदे गटाने 58 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवला. याउलट पानिपत झालेल्या महाविकास आघाडीला फक्त 49 मतदारसंघात विजय मिळण्याची शक्यता आहे. तर मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि तिसऱ्या आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवला नाही. भाजपच्या या अतिप्रचंड विजयामुळे महायुतीची सत्ता आल्यावर किंगमेकर होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आतातरी खरंच एकत्र येण्याची गरज आहे का, चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.


'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी विधानसभेच्या निकालांवरील चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी भाष्य करताना म्हटले की, कारण असं की राज ठाकरे यांच्यासाठी आयडियल जे सिनारिओ काय राहिला असता त्यांनी आपल्याच कार्यक्रमांमध्ये हे बोलून दाखवलं होतं की महायुतीची  सत्ता येणार, भाजपचा मुख्यमंत्री होणार आणि भाजपाची सत्ता येणार आणि आमच्या मदतीने मुख्यमंत्री होणार. त्यामुळे त्यांची इच्छा अपेक्षा आकांक्षा हे त्या पद्धतीचे आकडे येतील यावेत, अशीच होती किंवा अशीच असणार आहे. त्यामध्ये त्यांचे जर समजा पाच-सात जण निवडून आले तर ती स्थिती त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम असणार होती. या निवडणुकीमध्ये झाले असते की मुळामध्ये भाजपलाच इतकं प्रचंड यश मिळाले की, त्याच्यापुढे बाकी सगळ्या पक्षांचे जे काही यश आहे ते अगदी खुजं असं वाटावं, अशा प्रकारचं आहे. त्यामध्ये ज्यांच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही तर त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या सगळ्याच भवितव्याबद्दलच प्रश्न आहे. आता असं आहे की जर समजा त्यांना अपेक्षित असलेली स्थिती निर्माण झाली असती तर त्याचा परिणाम ज्या आगामी आता महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका होणार आहेत. ज्या मिनी विधानसभाच असणार आहेत, त्या वेळेला भाजपशी किंवा शिंदेंशी हात मिळवणे करून तिथल्या जागा मिळवणं, त्या जागा लढणं, आणि त्याच्यामध्ये त्या तिथल्या सत्तेमध्ये सहभागी होणं त्यांच्यासाठी फार सोपं झालं असतं. आता ती दारंसुद्धा त्यांच्यासाठी बंद होणार आहेत. कारण आता त्यांची त्या अर्थाने शिंदेंना गरज आहे, ना भाजपाला गरज आहे, राष्ट्रवादीला गरज असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची गरज ना आता काँग्रेसला घ्यावीशी वाटते, त्यांची गरज ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटते आणि उद्धव ठाकरेंना त्यांना घ्यावसं बरोबर वाटतच नाही, असे राजीव खांडेकर यांनी म्हटले. 


मनसेचा स्वत:च्या मर्जीने जगण्यापासून ते कोणालाही गरज नसण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला?


या चर्चेदरम्यान राजीव खांडेकर यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने त्यांना फायदा होऊ शकतो, असे वक्तव्य केले. मनसेचे आत्तापर्यंत असं की स्वतःच्या इच्छेने मी मला वाटेल तेव्हा जाऊ शकतो, अशा स्थितीतून कुणालाच नकोच्या अवस्थेमध्ये मनसे जाऊन पोहोचलेला आहे. मनसेच्यासाठी हा मोठा काळ आहे, मोठा संघर्ष  आहे. अर्थात राज ठाकरे गेली 18 वर्ष या संघर्षातून जात आहेत. राज ठाकरेंचं फॉलोईंग, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, त्यांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या व्हिडिओजना मिळणारे प्रचंड व्ह्यूज हे सगळं त्यांची एक जागा आली का शून्य जागा आली का त्यांना एकच जागा त्यांच्या आली होती निवडून तरीसुद्धा ट्रॅक्शन त्यांना खूप होते, असे निरीक्षण राजीव खांडेकर यांनी नोंदवले.


 आता तर ते अगदी शून्यावर आलेत त्यामुळे त्याच्यामध्ये जे गेल्याकेपीची स्थिती होती त्याच्यामध्ये घट झालेली आहे. पण त्यांच्या एकूण मनसे पक्षाच्या भविष्याबद्दल मोठा प्रश्न आहे. याच्यामध्ये मास्टरस्ट्रोक तो ठरू शकतो जर या पॉईंटला की आता उद्धव ठाकरेंचंही खूप मोठे नुकसान राजकीय झालेले आहे, मनसे तर पूर्ण रस्त्यावर आलेली आहे आणि त्यामुळे रस्त्यावर आलेले दोन पक्ष आणि दोन भाऊ हे जर एकत्र आले तर त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये एक नवं काहीतरी नवीन काहीतरी गणित निर्माण होऊ शकतं. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना असं वाटतं की या दोन्ही ठाकरेंनी त्यांचे इगो बाजूला ठेवावेत आणि एकत्र यावं.


एरवी जर हे दोन भाऊ नसते तर ते कदाचित कधीच त्यांचा एकमेकांबरोबर युती झाल्या असत्या. कारण कोणतेही वैचारिक आणि कसलंही म्हणजे काही संबंध नसलेले पक्षसुद्धा एकत्र आल्याचा आपण बघतो. रिपब्लिकन पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये वैचारिक दोन टोकाचे आहेत पण ते एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोन टोकाचे पण एकत्र आले. पण बाळासाहेब  ठाकरेंच्या विचाराच्या मुशीत घडलेले त्यांनाच आपलं दैवत मानणारे, त्यांच्याच विचारांवर त्यांच्यावर प्रेम करणारे बाकी त्यांच्यामध्ये कसलाही कसलेही अंतर नसणारे हे दोन भाऊ किंवा दोन पक्ष येत नाहीत एकत्र याचं कारण त्यांच्यामध्ये असलेला इगो आणि नात्याचं जे काही कुंपण आहे ते आहे.जर आत्ताच्या स्थितीमध्ये जर ते दोघेजण एकत्र आले तर फार लांब नाही, पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्येसुद्धा त्याचा फायदा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळेल, असे मत राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले.



आणखी वाचा


उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर