बारामती: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या पक्षाच्या चिन्हाचं नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट या चिन्हाचा उल्लेख तुतारी असा करण्यात आल्यामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता, त्यानंतर पक्षाने निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची मागणी केली होती. या निर्णयाचं आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं आहे.
काय म्हणालेत शरद पवार?
तुतारी वाजवणारा माणूस यामध्ये माणूस हा शब्द महत्त्वाचा आहे. मध्यंतरी तुतारी हे चिन्ह निवडणुकीच्या माध्यमातून पुढं आलं. त्यामुळे अनेक लोकांचा घोटाळा झाला. त्यामुळे हजारो मत चुकीच्या ठिकाणी गेली. पण, सुदैवाने निवडणूक आयोगाने जे दुसरं चिन्ह होतं, त्याचं नाव तुतारी होतं ते काढून टाकलं आहे, आणि त्या ठिकाणी ट्रम्पेट हे नाव टाकलं आहे. आता तिथं तुतारी हा शब्द राहणार नाही. तुतारी वाजवणारा माणूस हा शब्द राहिलं. हे लक्षात ठेवा. हे सर्वापर्यंत पोहोचवा आणि मतांचा विक्रम होईल आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणा असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
1980 सालची सांगितला अनुभव
आपल्या मतदारसंघात वेगळी स्थिती आहे. लोकांनी निवडून दिलं शक्ती दिली पण सत्तेचा वापर कसा करायचा त्याची जाण यांना नाही. अनेक लोक आपल्याला सोडून गेले. मत मागताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने मागितली. त्यानंतर निवडून आल्यावर ते गेले. माझा एक जुना अनुभव आहे. 1980 सालची निवडणूक झाली. त्यावेळी माझ्या नेतृत्त्वाखाली 58 आमदार निवडून आले. त्यानंतर मी विरोधी पक्षनेता झालो. विरोधी पक्षाच काम करायला लागलो. तेव्हा काही कारणास्तव मी इंग्लडचा गेलो. त्यावेळी मागे 58 पैकी 52 सोडून गेले, मी सहा लोकांचा नेता राहिलो. ही स्थिती महाराष्ट्रात देशात घडलेली होती. पण गंमत अशी 1980 ची निवडणूक झाली. जे पक्षाच्या नावाने आमदार झाले आणि पक्ष सोडून गेले. त्या 58 लोकांच्या पैकी 52 लोक हे निवडणुकीत पराभूत झाले. लोकांनी त्यांना धडा शिकवला. आज हीच अवस्था महाराष्ट्रात होणार आहे. पक्षफुटीनंतर आता मी ठिकठिकाणी जातो तेव्हा जनता मला सांगते निष्ठावंताच्या मागे ताकद उभी करायची आहे. त्यानुसार आपला विजय होईल यात मला शंका नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी
शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची पाडव्याला मोठी गर्दी होत असते. पवार प्रेमी राज्यभरातून बारामतीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी तसेच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात. परंतु आजच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली गोविंद बागेत पाहायला मिळाली.