पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळं महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर बंड पुकारलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील कॉंग्रेस बंडखोरांवर पक्षाकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. शिवाजी नगर मतदारसंघातून मनिष आनंद यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय बहिरट यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. कसबा पेठ मतदारसंघातून कमल व्यवहारे यांनी रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. तर पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोधात आबा बागूल यांनी बंडखोरी केली आहे. 


या बंडखोरांना आज शहर कॉंग्रेकडून नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आजपासून सहभागी व्हावे अशी सूचना करण्यात येणार आहे. हे बंडखोर प्रचारात सहभागी न झाल्यास त्यांच्याबद्दलचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसला पाठवण्यात येणार असून त्यांच्यावर उद्या किंवा परवा पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची पुण्यात बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना आगामी महापालिका निवडणूकीत नगरसेवकपदाची उमेदवारी न देण्याचा ठराव करण्यात येणार आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आज चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. 


उद्धव ठाकरेंनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना दाखवला इंगा 


पक्षविरोधी कारवाया केल्याने माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर - जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी - मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.


महाविकास आघाडी


शिवसेना-  बाबुराव माने – धारावी, सुरेंद्र म्हात्रे – अलिबाग, उदय बने- रत्नागिरी, मकरंदराजे निंबाळकर – धाराशीव, कुणाल दराडे – येवला, रणजीत पाटील – परंडा. 


काँग्रेस - मधू चव्हाण – भायखळा, तानाजी वनवे – नागपूर पूर्व, सुहास नाईक – शहादा तळोदा,  विश्वनाथ वळवी – नंदुरबार, मदन भरगड- अकोला, दिलीप माने -सोलापूर, हेमलता पाटील – नाशिक मध्य, राजश्री जिचकार – काटोल, अविनाश लाड -रत्नागिरी


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - जयदत्त होळकर – येवला, संदीप बाजोरिया – यवतमाळ, संगीता वाझे -मुलुंड, मिलिंद कांबळे – कुर्ला.