सांगली : निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यामुळे उमेदवारी मागणं हे काही गैर नाही. आमची त्याबाबत काही तक्रारही नाही. पण एकदा पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर तरी सर्वांनी पक्षासोबत यावं, पक्षाकडून त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी जतमधील विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांना केली. दरम्यान, जत येथे जत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असलेले आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्याच्या गटात असणारे राजेंद्र कोळेकर यांनी पडळकर यांची पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांना बिनशर्त पाठिंबा दिला. 


गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दोन दुश्मन सांगितले! 


जत तालुक्याचा दुष्काळ हा माझा एक नंबरचा शत्रू आहे. हा दुष्काळ हटवणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. दुसरा शत्रू हा ऊस तोडणारा कोयता आहे. कारण जत तालुक्यातील जवळपास 35 हजार बांधव हे ऊस तोडीसाठी बाहेर जातात, जत तालुक्यातील महिलांच्या हातातील ऊस तोडीचा कोयता कायमचा हद्दपार करणे हे आमचे ध्येय असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. 


जत विधानसभेसाठी भाजपकडून गोपीचंद पडळकर यांनाच उमेदवारी जाहीर झाली. यामुळे जत तालुक्यातील भाजपसह अन्य काही नेत्यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज (27 ऑक्टोबर) 6 वाजता कार्यकर्त्यांची  महत्वाची बैठक बोलावली. जत विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील भूमिपुत्राला उमेदवारी मिळावी व बाहेरील उमेदवार लादू नये यासाठी तालुक्यातील जानकर, विचारवंत, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची ही महत्वाची बैठक आहे. या बैठकीतून कोण काय निर्णय घेतोय याकडे जत तालुक्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी जत तालुक्यातील भाजप नेत्यांना ही विनंती केली आहे. 


पडळकरांचे विरोधक कोणता निर्णय घेणार?


दरम्यान, विलासराव जगताप यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जत विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील भूमिपुत्राला उमेदवारी मिळावी, बाहेरून उमेदवार लादू नये यासाठी तालुक्यातील जाणकार, विचारवंत, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची महत्त्वाचे बैठक माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रकाश जमदाडे, तमन्ना गौडा रवी पाटील शंकर वगरे सर्व विचार मांडणार आहेत. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विलासराव जगताप यांनी स्वतःसह अन्य कोणाच्या रुपातून बंडखोरी अटळ असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप समोर डोकेदुखी निर्माण झाली आहे.


पृथ्वीराज पाटलांना सांगलीतून उमेदवारी 


दरम्यान, सांगलीमधून पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष आणि  महाविकास आघाडीकडून सांगली विधानसभेसाठी माझ्या उमेदवारीची घोषणा होणे ही माझ्या केलेल्या लोकसेवेची आणि पक्षकार्याची पोचपावती असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे. या संपूर्ण कार्यात आमचे नेते मा. डॉ. विश्वजित कदम साहेब यांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन नेहमीच सोबतीला होते. सक्षम विचारांच्याबरोबर असणाऱ्या समृद्ध मार्गदर्शनाची जोड मा. डॉ. विश्वजित कदम साहेब यांच्यामुळे मिळाली. पुढील काळात काँग्रेस पक्षाचे कार्य अधिक सक्षमपणे करायचा हुरूप या संधीने मिळाला. मला दिलेल्या या संधीबद्दल आमचे नेते विश्वजीत कदम, महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांचा मी मनस्वी आभारी असल्याचेही म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या