नाशिक : माजी आमदार निर्मला गावीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर निर्मला गावीत यांना खोसकरांविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. निर्मला गावित यांनी 2019 च्या निवडणूकपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. निर्मला गावीत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात आहेत. निर्मला गावीत यांच्यां प्रवेशासाठी आपल्यावर अन्याय करण्यात आल्याचा हिरामण खोसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना आरोप केला होता.
हिरामण खोसकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा निर्मला गावीत यांनी केला होता. काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत अद्याप पक्षाकडून बोलावणे नाही, नाना पटोले यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी देखील उमेदवारी बाबत चर्चा केल्याची माहिती निर्मला गावीत यांनी दिली आहे. शिवसेना उबाठाला जागा सुटावी यासाठी आग्रही मात्र काँग्रेस जागा सोडत नसल्यानं निर्मला गावीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्यानं पक्ष प्रवेशाला अडचण येणार नाही,मात्र अद्याप वेळ तारीख ठरली नाही. 2019 च्या निवडणुकीत हिरामण खोसकर यांनी निर्मला गावीत यांचा पराभव केल्यानंतर पुन्हा हे दोघे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे.
निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
माजी आमदार निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली होती. मात्र 2019 साली त्यांचा पराभव झाला . आता आगामी निवडणुकीत त्यांची दिशा काय याविषयी उत्सुकता वाढली आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ सुरवातीपासूनच काँग्रेसचा गड राहिलाय तर दोन वेळा इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पसंती दिलीय. 1980 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास 1980, 1985, 1995, 2009 आणि 2014 अशा पाच निवडणुकात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तर 1999 आणि 2004 या सलग दोन निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा मतदार संघावर फडकला आहे. 1999 मध्ये पांडुरंग गांगड तर 2004 मध्ये काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. 1990 च्या एकाच निवडणुकीत मात्र यादवराव वांबळे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुललं.
हे ही वाचा :