Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामधील वाद विकोपाला गेला आहे. विदर्भातील जागांवरून ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याने आणि काँग्रेस सुद्धा आपली भूमिका सोडायला तयार नसल्याने आता या वादामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवेश झाला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील वाद कोणत्याही परिस्थितीत थांबवण्यासाठी पहिल्यांदा शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वाद कोणत्याही परिस्थितीत थांबवून जागावाटप तातडीने करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.  त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जयंत पाटील थेट आज (20 ऑक्टोबर) रात्रीच मातोश्रीवर पोहोचणार आहेत.


जयंत पाटील 'करेक्ट कार्यक्रम' करून वाद सोडवणार का? 


आज रात्री सव्वा दहाच्या सुमाराच्या जयंत पाटील मातोश्रीवर जाऊन जागावाटपा संदर्भात बैठक करणार आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे हे बालमोहन शाळेमध्ये एकत्र शिकले आहेत. त्यामुळे ते दोघेही बालपणापासून एकमेकांना चांगले परिचयाचे आहेत. आणि त्यांची दोस्ती सुद्धा नेहमीच चर्चिली जाते. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या वादावर जयंत पाटील 'करेक्ट कार्यक्रम' करून वाद सोडवणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, या बैठकीत सक्षम उमेदवार नसल्यास उमेदवार बदलण्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये 89 विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली असून 10 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.  


त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येही वादातील जागांवर लवकरात लवकर तोडगा काढून यादी जाहीर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विदर्भातील जागांवरुन जो वाद पेटला आहे त्यावरून चर्चेला खीळ बसली आहे. त्यामुळे वाद सोडवण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता जयंत पाटील सुद्धा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज रात्री तरी हा वाद संपून उद्यापर्यंत महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर केले जाणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या