पंढरपूर: उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात होऊन दोन दिवस झाले तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारा महाविकास आघाडीचा तिढा सुटायला तयार नसून हीच अवस्था महायुतीची (Mahayuti) देखील बनली आहे . जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात त्रांगडे झाले असून सांगोला  मतदार संघात ठाकरे गटाने आधी उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडी तर बिघाडीच झाल्याचे समोर येत आहे. पंढरपूर, माढा, मोहोळ आणि करमाळा या चार मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती दोघांकडूनही उमेदवार देण्यास अजूनही दोन दिवस लागणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार देण्याच्या घोषणेमुळे जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता.


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जागा शरद पवार यांच्याकडे असून त्यांनी या जागेसाठी भगीरथ भालके प्रशांत परिचारक आणि अनिल सावंत या तिघांच्या नावावर विचार सुरू ठेवला आहे. मात्र, अजूनही निर्णय न झाल्याने अखेर आज भगीरथ भालके हे आपला उमेदवारी अर्ज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी दाखल करणार आहेत. दुसऱ्या बाजूला फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर, मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्यासाठी गेल्या चार दिवसापासून मॅरेथॉन बैठका सुरू केल्याने त्यांची ही भूमिका अजून संदिग्ध आहे. 


परिचारकांच्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेमुळे भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचीही उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही . मात्र, परिचारक हे शरद पवार गट किंवा अपक्ष निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत असल्याने येत्या दोन दिवसात भाजप आमदार समाधान आवताडे यांची उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे . गेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला फार मोठी आघाडी मिळाल्याने आता मनोज जरांगे पाटील यांचाही उमेदवार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात येऊ शकणार आहे. त्यामुळे आता येथील लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाची उमेदवारी अजूनही दोन दिवस लांबण्याची शक्यता असल्याने सर्वच इच्छुक गॅसवर आहेत. 


विधानसभेला माढ्यात काय होणार?


माढा विधानसभा मतदारसंघ हा सर्वात जास्त चर्चेत असला तरी शरद पवार गटाकडे उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. हीच पवारांची अडचण असून सध्या तरी माढ्यातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे अभिजीत पाटील आणि संजय बाबा कोकाटे या तीन नावावर विचार सुरू आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी महायुतीतून लढणार नसल्याचे जाहीर करीत शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितल्याने महायुतीकडे उमेदवारच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत जागा वाटपात ही जागा शिंदे सेना घेऊन या मतदारसंघातून शिवाजीराव सावंत किंवा शिवाजीराव कांबळे यापैकी एकाला उमेदवारी देऊ शकतात. माढा विधानसभा मतदारसंघातही मनोज जरांगे यांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात असल्याने या जागेवर जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय धनंजय साखळकर हेही उतरण्याची तयारी करीत आहेत. सध्या तरी माढ्यात महायुतीला पुन्हा नव्याने उमेदवार शोधण्यापासून सुरुवात झाली आहे. 


अशीच अवस्था सध्या करमाळा आणि  मोहोळ या मतदारसंघात असून शरद पवार गटाकडे इच्छुकांची मांदियाळी दिसत आहे तर महायुतीला उमेदवार शोधावा लागत आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातर्फे माजी आमदार नारायण आबा पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना महायुतीच्या सोबत असणारे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांनी मात्र आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढविण्याचे घोषित केल्याने महायुतीला आमदार शिंदे यांना पाठिंबा दिल्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. दुसऱ्या बाजूला करमाळ्यातील प्रबळ मानला जाणारा आणि सध्या भाजपसोबत असणारा बागल गटातून दिग्विजय बागल हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून महायुतीतून ही जागा आपल्याला मिळावी असा बागल गटाचा प्रयत्न आहे. करमाळा मतदार संघात देखील मनोज जरांगे पाटील यांची मोठी ताकद असल्याने जरांगे या मतदारसंघात प्राध्यापक रामदास झोळ यांना उतरवण्याच्या तयारीत आहेत. 


मोहोळ या राखीव मतदार संघात महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्याने आता महाविकास आघाडीकडे संजय क्षीरसागर, राजू खरे, रमेश कदम आणि आता नुकताच प्रवेश केलेले भाजपचे लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मोहोळ मध्ये माजी सनदी अधिकारी शैलेश कोथमीरे यांचेही नाव नव्याने चर्चेत आले असून नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची हा पवार यांच्या पुढचा मोठा प्रश्न आहे. सध्या तरी मोहोळ मतदार संघातून संजय क्षीरसागर आणि राजू खरे या दोन नावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. 


शरद पवार गटाकडून उमेदवार निवडीत घोळ


एका बाजूला भाजप शिंदे सेना व उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करीत आघाडी घेतली असताना शरद पवार गटाकडून मात्र अजूनही उमेदवार निवडीचा घोळ सुरूच आहे. आज जयंत पाटील हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबई बाहेर असणार आहेत, तर सुप्रिया सुळे या हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत . शरद पवारही आज ठाणे येथे जाणार असल्याने आज संध्याकाळपर्यंत मुंबई शरद पवार गटात शांतताच असणार आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाने एकतर्फी उमेदवारांच्या घोषणा करून एबी फॉर्म वाटल्याने महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ अजून पूर्णपणे संपलेला नसल्याने बिघाडी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही जागांवरील  उमेदवारांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की देखील येऊ शकणार आहे . असे न झाल्यास सोलापूर जिल्ह्यात सांगोला दक्षिण सोलापूर अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील दिसू शकणार आहेत.


आणखी वाचा


मविआच्या जागावाटपाचं गणित चुकलं, सगळा गोंधळच गोंधळ; काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार?