मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आपल्या गटातील बंडखोरांची समजूत काढून अधिकृत उमेदवाराच्या विजयाचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते राबत आहेत. राज्यात मविआची सत्ता आली तर तुम्हाला विधानपरिषदेची आमदारकी देऊ किंवा महामंडळ देतो, अशी आश्वासने मविआच्या नेत्यांकडून बंडखोरांना दिली जात असल्याचे समजते.
महायुती सरकारने अलीकडेच विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त आमदारांची 7 पदे भरली होती. मात्र, अद्याप 5 जागा रिक्त आहेत. मविआची सत्ता आल्यास यापैकी एका जागेवर तुम्हाला संधी देऊ, असे आमिष बंडखोरांना दाखवले जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि अशोक गेहलोत हे दोन ज्येष्ठ नेते मुंबईत ठाण मांडून बंडखोरांनी वाटाघाटी करत आहेत. तर ठाकरे गटाच्या बंडखोरांशी संजय राऊत हे चर्चा करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या बंडखोरांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या तिन्ही पक्षांच्या वाटाघाटीचे सूत्र एकच दिसत आहे. मविआ सत्तेत आल्यावर विधानपरिषद किंवा महामंडळावर वर्णी लावू, असे बंडखोरांना सांगितले जात आहे. त्यामुळे आता मविआतील किती बंडखोर माघार घेणार, हे बघावे लागेल.
महायुतीकडून देवेंद्र फडणवीस बंडोबांना थंड करण्याच्या कामाला
राज्यातील तब्बल 35 जागांवर झालेल्या बंडामुळे महायुतीचे उमेदवार धोक्यात आहेत. यामध्ये संघ परिवार आणि भाजपशी निष्ठावंत असलेल्या अनेक जुन्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपची आणि पर्यायाने महायुतीची डोकेदुखी वाढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही बंडखोरी शमवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी दिवसभर फोनाफोनी करत होते, असे सांगितले जाते. काही बंडखोरांना चर्चेसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे. याशिवाय, रावसाहेब दानवे, डॉ. भागवतराव कराड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय या नेत्यांवरही बंडखोरांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.
रमेश चेन्नीथलांचे 36 बंडखोरांना फोन
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसच्या मुंबई येथील वॉर रूम बसून राज्यभरातील 36 बंडखोरांना व्यक्तीश फोन करत अर्ज मागे घेण्याची विनंती केली. यात काँग्रेसचे उमेदवार असलेल्या विधानसभा मतदार संघासह ठाकरे गट व शरद पवार गट यांच्या मतदारसंघात उभे राहिलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांचा समावेश आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाला तुमच्या मदतीची गरज आहे. पक्ष सत्तेत आपल्या नंतर पक्ष तुम्हाला योग्य तो न्याय देईल असे आश्वासन रमेश चेन्नीथला या बंडखोरांना दिले.
आणखी वाचा