जालना: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार समरजीत घाडगे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये जाऊन समरजीत घाटगे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
समरजीत घाटगे कागल मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, सकाळी त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन मनोज जरांगे यांचा सत्कार केला. मनोज जरांगे आणि समरजीत घाटगे या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा देखील झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
भेटीनंतर समरजीत घाटगे यांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर समरजीत घाटगे यांनी याबाबतची पोस्ट सोशल मिडियावरती शेअर केली आहे, "संघर्षयोद्धा मनोजजी जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट! आज मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणारे संघर्षयोद्धा शिवश्री मनोजजी जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असून लवकरच त्यांच्या लढ्याला यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी आजवर आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक मराठा युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले असून आपला लढा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले", असं घाटगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जरांगेंच्या भेटीनंतर काय म्हणाले घाटगे?
मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ मागितली होती. त्यांनी मला वेळेतून वेळ काढून दिला. मला भेट दिली. आमच्याच चर्चा झाली. मी कागल विधानसभा मतदारसंघातून उभा आहे. त्यामुळे मला तुमचं सहकार्य करा. त्यासाठी मी आलो आहो, असं मी मनोज जरांगेंना सांगितलं. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, शाहू महाराजांचं घराणं आहे. त्यांचाही मान राखला पाहिजे. त्यावर मी त्यांना फक्त तुमचं लक्ष असू द्या, अशी विनंती केली आहे. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या 3 तारखेला त्यांची मिटिंग आहे. त्यात ते निर्णय घेणार आहेत, असं समरजीत घाटगे यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा. महाराष्ट्रात ज्यांनी आमच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्या.सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा.चांगली संधी आलेली आहे. ओढातानीच्या नादात ही संधी घालू नका. कालपासून मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.काल मराठा, दलित, मुस्लिम हे समीकरण एकत्र आल आहे.आम्हाला तीन तारखेला मतदार संघ आणि उमेदवार जाहीर करायचे आहे. त्यामुळे आज किंवा उद्या एकत्र बसून एकच उमेदवार जाहीर करा, असं मनोज जरांगे यांनी आज म्हटलं आहे.