Jayant Patil : सिंचन घोटाळ्यातील फाईलवर तत्कालिन गृहमंत्री आर आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात बोलताना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हयात नसलेल्या व्यक्तीबाबत बोलताना योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर याच कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.  

Continues below advertisement


काय म्हणाले जयंत पाटील?


जयंत पाटील यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात बोलताना सांगितले की, आज आबा हयात नाहीत. एखाद्या माणसाच्या निधनानंतर अशी गंभीर विधान त्यांच्या बाबतीत करणे आणि त्या माणसाला आपली बाजू मांडण्याची संधी न मिळणे हा त्यांच्या अन्याय आहे. आबा किती स्वच्छ होते, किती चांगल्या प्रतिमेचे होते हे सगळ्या महाराष्ट्रला माहिती आहे. डान्सबार बंदी करण्यात आबांचा किती पुढाकार होता हे महाराष्ट्राला माहिती आहे. 



दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार 


पाटील यांनी सांगितले की, ते महाराष्ट्रातील लोकप्रिय गृहमंत्री होते आणि त्यांच्या पुढे आलेल्या गोष्टीवर त्यांनी सही केली. ती सही असलेली फाईल सरकार बदलल्यावर ज्यांच्यावर आरोप होते त्यांना बोलावलं आणि त्यांना फाईल दाखवली. म्हणजेच त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना बोलवून त्यांची फाईल दाखवली म्हणजे या राज्यामध्ये काय चाललंय आहे? मी आरोप करायचे फाईल आल्यावर ज्याच्यावर मी आरोप केले त्यालाच फाईल दाखवायची म्हणजे दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार आहे. अशी पद्धत असते का? आणि अजितदादांनी त्यांनाच ती फाईल बोलून दाखवली तर ती एवढी स्टोरी एवढी सांगायची नव्हती आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्यांनी अडचणीत आणलं आणि हे दोघं कसे सच्चे मित्र आहेत हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळालं. वारंवार तिकडे जाऊन शपथ घेण्याचा जो प्रयत्न आहे तो त्याचाच एक भाग आहे असे मला वाटते, असा खोचक टोलाही लगावला. 


काय म्हणाले होते अजित पवार? 


अजित पवार म्हणाले की, 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र, माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर मला बोलवून आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या