Raj Thackeray: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार आणि खासदारांनी वेगळा निर्णय घेतला, त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, त्यानंतर काही महिन्यांनी अजित पवारांनी देखील समर्थक आमदार आणि खासदार यांच्यासोबत शिवसेना-भाजपच्या सत्तेत सामील झाले. राज्यात दोन मोठे पक्ष फुटल्याने मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावरती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमामध्ये भाष्य केलं आहे. 


कार्यक्रमावेळी राज ठाकरे म्हणाले, मला दु:ख कोणाचं चिन्हं गेल्याचं किंवा पक्ष फुटल्याचं नाही. या प्रोसेसला माझा विरोध आहे. सर्वात आधी शरद पवारांपासून याची सुरूवात झाली. फोडाफोडीचं राजकारण मी समजू शकतो. तुम्ही ४० आमदार घेऊन गेलात. नाव घेणं, चिन्हं घेणं, हे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव घेणं, घड्याळ चिन्ह घेऊन जाणं हे योग्य नाही. उदाहरणार्थ समजून घ्या शिवसेना. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही काही उध्दव ठाकरेंची कमाई नाही. ती बाळासाहेब ठाकरेंची कमाई आहे. बाळासाहेब ठाकरेंचं ते नाव आहे, त्यांचं ते अपत्य आहे. त्यांनी कमावलेली ती निशाणी त्यांची आहे. अशा प्रकारचं राजकारण मला नाही आवडत, हे बोलणंही पाप आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.


शिवसेना मिळवण्याच्या संधीबाबत राज ठाकरेंचं वक्तव्य


बाळासाहेब ठाकरेंचा वारस म्हणून तुमच्याकडं बघितलं जात होतं, ही संधी होती तेव्हा ती घेतली नाही. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा बाहेरचा दृष्टीकोन आहे. मी काय विचार करतोय, हे मला कधीच विचारलं गेलं नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची एक उभी केलेली प्रॉपर्टी आहे. ती समजा त्यांना त्यांच्या मुलाला द्यायची असेल तर, मी कधीच त्यावर दावा सांगितला नाही. मी माझ्या कुलदैवतेची शपथ घेऊन सांगतो. मी माझ्या डोक्याला शिवलं देखील नाही. मी अनेकदा बाळासाहेबांना ही गोष्ट सांगून झाली होती. अनेकांना असं वाटतं होतं मी त्यावर दावा सांगेन. पण तो माझ्या मनात कधीच विचार नव्हता. त्या पक्षात असेपर्यंत अगदी शेवटपर्यंत माझा एकच प्रश्न होता. माझा जॉब काय? निवडणुकीसाठी मी फक्त प्रचार करणार, आणि येऊन बसणार हे माझ्याकडून होणार नाही. त्यासाठी मी बाहेर पडतो. मी कोणत्या बैठका, सभा, कशाला जात नव्हतो, असंही राज ठाकरे म्हणालेत.


राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीविषयी नाराजी व्यक्त केली. असा प्रकार कोणत्याही पक्षासोबत होता कामा नये. मी अशी गोष्ट केलेली नाही. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.


अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला


अमित ठाकरेंना माहीम विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभेच्या रिंगणात का उतरवले, याचं उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिलं आहे. माहीमच का निवडले?, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला, पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावं, मी सुद्धा लढेन. मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस, तो म्हणाला पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावे , मी सुद्धा लढेन. आधी भांडुप बद्दल चर्चा.. मी म्हणालो भांडुप?, निवडणूक लढणे हे माझे टेम्परामेंट नाही. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो, अमितला कसं समजावयचे याचा मी विचार करत होतो. अमितने ठरवले आहे, आज उभा केलं नाही, तर उद्या उभा करावाच लागेल, असे म्हणत राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याबाबत माहिती दिली.