Amit Ghoda Palghar: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून प्रचाराला जोर आणखी वाढताना दिसेल. मात्र पालघर जिल्ह्यात एका वेगळ्याच पातळीवर राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा (Palghar Amit Ghoda) गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नेते माजी आमदार अमित घोडा (Amit Ghoda) यांनी पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित घोडा गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. त्यांनी भाजपाकडून आयात करण्यात आलेल्या माजी खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
भाजपला बंडखोरी रोखण्यात यश मिळणार?
अमित घोडा हे मागील शिवसेनेचे आमदार असून 2019 मध्ये उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना डहाणू किंवा पालघरची उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र ऐनवेळी राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्याने अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या म्हणजे 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का?, भाजपला बंडखोरी रोखण्यात यश मिळणार का?, हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे.
पालघरमधील विद्यामान आमदार श्रीनिवास वनगाही होते नॉट रिचेबल-
पालघरचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न दिल्याने ते देखील नाराज होते. श्रीनिवास वनगा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तब्बल 4 दिवस श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल होते. जवळपास 100 तासांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले होते. घरी पुन्हा आल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या चेहऱ्यावर नाराजी, राग, दुःख दिसून येत आहे. चार दिवसांनंतर घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. षडयंत्र करून माझं तिकीट कापलं गेलं. पद असलं नसलं तरी, मी काम करत राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला विश्वासू वाटतात, पण त्यांच्या जवळची लोकं त्यांना मिस गाईड करतात, अशी नाराजी श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली.