Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसतायत. दरम्यान, आज (सोमवार) संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असताना राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सांगता सभा पार पडणार आहे. या सांगता सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्याच्या राजकीय वर्तुळाळतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्या राजकीय संन्यासाची (Political Retirement) घोषणा केली आहे.


यावेळी त्यांनी मुक्ताईनगर मतदासंघांतील जनतेला भावनिक साद घालत रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केलं आहे. राज्यात एकीकडे सर्वत्र  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धावपळ सुरू असताना एकनाथ खडसे यांनी केलेल्या या घोषणेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


नेमकं काय म्हणाले एकनाथराव खडसे?     


मुक्ताईनगर मतदासंघांतील मायबाप जनतेला माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब यांचे विनम्र आवाहन. यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे. तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल.


पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की, आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना (Rohini Khadse) करावं आणि रोहिणी ताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे ही विनंती. असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. 


हे ही वाचा